Kolhapur- पुंडलिक होसमनी बाळूमामा ट्रस्टचे नवे कार्याध्यक्ष, विश्वस्तांच्या सभेत एकमताने निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 01:40 PM2023-04-05T13:40:51+5:302023-04-05T13:41:15+5:30
संपत्ती हेच वादाचे मुख्य कारण बनले
कोल्हापूर : आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू श्री बाळुमामा देवालय ट्रस्टच्या कार्याध्यक्षपदी ट्रस्टचे जुने विश्वस्त पुंडलिक हणमाप्पा होसमनी (रा. निंगापूर, ता. मुदोळ, कर्नाटक) यांची मंगळवारी विश्वस्तांच्या सभेत एकमताने निवड झाल्याची माहिती सरपंच व ट्रस्टचे पदसिध्द विश्वस्त विजय गुरव यांनी दिली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विश्वस्त भिकाजी बापू शिनगारे होते. या निवडीवेळी ट्रस्टचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले हे अनुपस्थित होते.
या ट्रस्टमध्ये मानद अध्यक्षापेक्षा कार्याध्यक्षाला सर्वाधिकार आहेत. भोसले यांना कार्याध्यक्ष व्हायचे आहे. त्यातून त्यांच्यात व गुरव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. त्या संघर्षातूनच सोमवारी येथील धर्मादाय उपायुक्त कार्यालयासमोर भर रस्त्यावर एकमेकांना चपलेने मारहाण करण्याची घटना घडली होती.
या ट्रस्टची महाराष्ट्र - कर्नाटक अशी नोंदणी २००३ला झाली. तेव्हापासून रामभाऊ मगदूम हे कार्याध्यक्ष होते. त्यांचे १९ फेब्रुवारी २०२३ ला निधन झाले. त्यामुळे त्यांचे उत्तराधिकारी निवडण्यावरून वाद सुरू आहे. ट्रस्टचे एकूण १८ विश्वस्त आहेत. परंतु, त्यातील सहाजण मयत आहेत. त्या जागांवरही कुणाला घ्यायचे यावरून न्यायालयीन वाद सुरू आहेत. मंगळवारी कार्याध्यक्ष निवडण्यासाठी आदमापूर येथेच बैठक होणार होती.
परंतु, वादामुळे ती मंदिरात न घेता इतरत्र घेण्यात आली. त्यास मानद अध्यक्ष भोसले व पदसिध्द विश्वस्त व मुदाळच्या पोलिसपाटील माधुरी लक्ष्मण पाटील अनुपस्थित होत्या. अन्य दहा विश्वस्तांच्या बैठकीत नवीन कार्याध्यक्षांची निवड करण्यात आली. होसमनी यांचे नाव शामराव होडगे यांनी सुचविले. त्यास गोविंद पाटील यांनी अनुमोदन दिले. वकिलांच्या सल्ल्यानुसार कायदेशीर प्रक्रिया अवलंबूनच ही निवड झाल्याचे सरपंच गुरव यांनी स्वत:हून लोकमतला फोन करून सांगितले.
वादाचे मूळ...
या ट्रस्टचे वार्षिक उत्पन्न किमान दहा कोटींहून जास्त आहे. आदमापूर येथे सुमारे पंचवीस एकर क्षेत्रावर बाळूमामाचे मंदिर असून, तिथे महाराष्ट्र - कर्नाटकातून भाविक मोठ्या संख्येने येतात. अमावास्येला तर मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. तिथे भक्तनिवास, अन्नछत्र व ५० खाटांचे रुग्णालय आहे. त्याशिवाय बाळूमामाच्या ३० हजार बकऱ्या आहेत. त्याचे १८ ठिकाणी तळ आहेत. ही संपत्ती हेच वादाचे मुख्य कारण बनले आहे.
बाळूमामा ट्रस्टवर गावातील विश्वस्त घेण्यास माझा विरोध असल्याचे चित्र तयार केले जाते. तसे काही नसून, गावातील कुणालाही विश्वस्त म्हणून घ्यावे. परंतु, गावाला विश्वासात घेऊनच त्यांची निवड करावी, एवढीच आमची मागणी आहे. - विजय गुरव पदसिध्द विश्वस्त व सरपंच, आदमापूर (ता. भुदरगड)
...हे आहेत विश्वस्त
धैर्यशील भोसले - आदमापूर - मानद अध्यक्ष, रावसाहेब कोणकेरी, भडगाव - सचिव, विश्वस्त सर्वश्री शामराव होडगे - जरळी, शिवाजी मोरे - औरनाळ, तमण्णा मासरेडी - मेतकूड, ता. मुदोळ, रामाप्पा मरेगुड्डी - हालकी, ता. मुदोळ, भिकाजी बापू शिनगारे - रूकडी, गोविंद दत्तू पाटील - मेतके, पुंडलिक होसमनी - निंगापूर, आप्पासाहेब बाबुराव दळवी - आप्पाचीवाडी, विजय विलास गुरव - सरपंच (पदसिध्द विश्वस्त) व माधुरी लक्ष्मण पाटील (पदसिध्द विश्वस्त - पोलिसपाटील, मुदाळ, ता. भुदरगड).