कोल्हापूर, पुणे संघ अजिंक्य
By admin | Published: November 9, 2015 11:16 PM2015-11-09T23:16:14+5:302015-11-09T23:19:00+5:30
चुरशीचे सामने : बाबासाहेब चितळे चषक राज्य व्हॉलिबॉल स्पर्धा
भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथे झालेल्या बाबासाहेब चितळे चषक ४२ व्या कनिष्ठ राज्य अजिंक्यपद व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाच्या संघाने, तर मुलांच्या गटामध्ये पुणे विभागाच्या संघाने विजेतेपद पटकाविले.
महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल संघटना, सांगली जिल्हा संघटना व बाबासाहेब चितळे चॅरिटेबल टस्ट भिलवडी यांच्या विद्यमाने भिलवडी (ता. पलूस) येथे ‘जानकीबाई चितळे क्रीडा नगरी’त सलग तीन दिवस या स्पर्धा झाल्या. मुलींच्या गटात अत्यंत चुरशीच्या व रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यामध्ये कोल्हापूर विभागाच्या संघाने पुणे विभागाच्या संघाचा ३-० असा (२५-१८, २५-२१, २५-१३) पराभव केला. मुलांच्या गटात पुणे विभागाच्या संघाने नागपूर विभागाच्या संघाचा ३-१ अशा सेटने (२५-२१, २०-२५, २५-१५, २५-१४) पराभव केला.
तृतीय स्थानासाठी झालेल्या लढतीत मुलींच्या गटात मुंबई विरुध्द नागपूर या लढतीत मुंबईने २-० असा विजय मिळवला. मुलांच्या गटात लातूर विरुद्ध कोल्हापूर या लढतीत लातूरने २-० अशी बाजी मारली.
मुलींच्या कोल्हापूर संघात समीक्षा किणीकर, प्रज्ञा वरेकर, नेहा शिंदे, ऋतुजा कदम, कल्याणी भोळे, ऋतुजा ऐतवडे, तर पुणे विभागाच्या गायत्री भैरवकर, वैष्णवी कोदरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. मुलांच्या पुणे संघातील निनाद बोंगाणे,प्रीतम जाधव, रवी भगत यांच्या समन्वयाने विजयश्री खेचून आणली. नागपूर संघाच्या प्रणय वाबीटकर, आशिष शर्मा, मधुर मरस्कोल्हे यांनी एकाकी, पण चिवटपणे झुंज दिली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय सहसंचालक नरेंद्र सोपल, काकासाहेब चितळे यांच्याहस्ते विजेत्या संघास चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.