कोल्हापूर : गुन्हेगाराला शिक्षा होणे म्हणजे सत्याचा शोध घेणे : अभिनव देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:20 PM2018-10-31T12:20:43+5:302018-10-31T12:24:52+5:30
पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास योग्य करणे, गुन्हेगाराला शिक्षेस पात्र करणे, म्हणजे सत्याचा शोध घेतल्यासारखे आहे, हेच न्यायदेवतेला अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.
कोल्हापूर : पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास योग्य करणे, गुन्हेगाराला शिक्षेस पात्र करणे, म्हणजे सत्याचा शोध घेतल्यासारखे आहे, हेच न्यायदेवतेला अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.
शाहूवाडी विभागीय पोलीस कार्यालयाच्या वतीने पोलीस मुख्यालयात दोषसिद्धी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी डॉ. देशमुख बोलत होते. त्यांनी तपास करताना घ्यावयाची दक्षता, तपासामध्ये भारतीय पुरावा कायदा, तसेच तांत्रिक पुरावा यांचे महत्त्व सांगून गुन्हे दोषसिद्धी वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ विधिज्ञ शिवाजीराव राणे यांनी सत्र न्यायालयात चालणाऱ्या गुन्ह्यांचे तपासादरम्यान राहणाऱ्या त्रुटींबाबत अवगत करून त्या कशा पद्धतीने टाळता येतील आणि गुन्हा घडल्यापासून गुन्ह्यांची माहिती फिर्यादीद्वारा प्राप्त झाल्यापासून घटनास्थळाचा पंचनामा, जबाब, तपास टिपणे, नेमक्या व मोजक्या शब्दांत नोंद करण्याबाबत माहिती दिली.
सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी न्यायालयीन गुन्हे, तपास व दोषसिद्धीसंबंधी मार्गदर्शन करून साक्षीदार, पंच व सरकारी अभियोक्ता यांच्यासोबत तपासी अंमलदाराचा समन्वय असणे गरजेचे आहे, असे सांगितले. अनुराधा देसाई यांनी वाढते अपघात ही चिंतेची बाब असून, लोकांनी हेल्मेट, सीट बेल्ट वापरणे व स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे. अपघाताचे गुन्हे आणि तपास, त्यांचे पंचनामे याबाबत मार्गदर्शन केले.
सरकारी वकील सुजाता इंगळे यांनी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण व महिला अत्याचारावरील गुन्ह्यांच्या तपासाबाबत मार्गदर्शन केले. अॅड. उदयसिंह जगताप यांनी गर्दी, मारामारी व प्रथमवर्ग न्यायालयात चालणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, महिला परिवीक्षा उपअधीक्षक डॉ. रोहिणी साळोखे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.