महाराष्ट्रातील सोन्याच्या खाणीसाठी कोल्हापूरकरांचा ऐेंशीपासून पाठपुरावा

By संदीप आडनाईक | Published: December 3, 2022 12:09 PM2022-12-03T12:09:51+5:302022-12-03T12:10:50+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूगर्भातही सोने असल्याची शक्यता पाहून राज्याच्या खनिकर्म विभागाने चाचणी सुरू केली आहे.

Kolhapur pursuit of gold mining in Maharashtra since the 1980 | महाराष्ट्रातील सोन्याच्या खाणीसाठी कोल्हापूरकरांचा ऐेंशीपासून पाठपुरावा

संग्रहीत फोटो

Next

संदीप आडनाईक

कोल्हापूर : महाराष्ट्रात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोन्याच्या खाणी असल्याचा ठाम दावा १९८० पासून सातत्याने कोल्हापूर खनिकर्म विभागाचे अधिकारी रामसिंग हजारे आणि ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी हे करत आहेत. त्यांना विज्ञान प्रबोधिनी, शासकीय कर्मचारी संघटना, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोशिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव देसाई यांची साथ मिळाली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू असताना डॉ. एम.जी. ताकवले यांनी स्वतः नमुने घेऊन खातरजमा केली होती आणि आपला अहवाल तत्कालीन प्रभारी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि केंद्रीय खाणकाममंत्री श्रीपाद नाईक यांना सादर केला होता. त्याच्या मूळ प्रती अद्यापही उदय कुलकर्णी यांच्याकडे आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूगर्भातही सोने असल्याची शक्यता पाहून राज्याच्या खनिकर्म विभागाने चाचणी सुरू केली आहे. शिवाय दोन ठिकाणी सोन्याच्या खाणी असल्याचेही विभागाने जाहीर केले आहे; परंतु १९८० मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कळणे आणि रेडीज येथील खाणीत सोन्याचे धातू आढळल्याचा अहवाल देण्यात आला होता. यासोबतच बेगमपूर आणि मंगळवेढ्याच्या नदीपात्रातही मौल्यवान धातूचे अंश आढळले होते. मात्र, आर्थिक कारणांमुळे यावर पुढची कार्यवाही झालेली नाही. बेगमपूर येथील वाळू आणि वडाची चार पोती पाने जाळल्यानंतर ०.६ मिलिग्रॅम सोने आढळले होते. 

यासाठी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव देसाई, कुलगुरू डॉ. एम.जी. ताकवले यांच्यामार्फत खनिकर्मचे रामसिंग हजारे आणि उदय कुलकर्णी यांच्याकडील अहवाल तपासले आणि यात अशास्त्रीय काही नसल्याचे स्पष्ट केले आणि छायाचित्रकार अनिल वेल्हाळ यांनी रसायनशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक यांच्या पथकाने विद्यापीठामार्फत चाचण्या केल्या. स्वत: ताकवले यांनी हजारे यांच्या पद्धतीनुसार चाचण्या घेतल्या आणि नमुने घेतले. हा अहवाल तत्कालीन राज्यपाल, राष्ट्रपतींसोबतच तत्कालीन प्रभारी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि केंद्रीय खाणकाममंत्री श्रीपाद नाईक यांना सादर केला होता.

मान्यवरांची साथ

या प्रवासात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, तत्कालीन केंद्रीय मंत्री मधू दंडवते, राज्यातील नेते दिग्विजय खानविलकर, गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. द.ना. धनागरेे, शासकीय कर्मचारी संघटनेचे मारुतराव वायंगणकर, गोखले महाविद्यालयातील भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. प्रभू आदींची साथ मिळाली होती. इंदिरा गांधी यांच्याकडील पत्रव्यवहारामुळे काही काळ लोहखनिजाची निर्यातही बंद झाली होती.

Web Title: Kolhapur pursuit of gold mining in Maharashtra since the 1980

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.