कोल्हापूर : पुष्पा भावे यांना राजर्षि शाहू पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 06:56 PM2018-06-18T18:56:18+5:302018-06-18T18:56:18+5:30
कोल्हापूर येथील राजर्षि शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा २0१८ चा राजर्षि शाहू पुरस्कार ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांना जाहीर करण्यात आला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
कोल्हापूर : येथील राजर्षि शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा २0१८ चा राजर्षि शाहू पुरस्कार ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांना जाहीर करण्यात आला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
शाहू जयंतीदिनी २६ जून रोजी कोल्हापूर येथील शाहू स्मारक सभागृहामध्ये सायंकाळी ६ वाजताश्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण होणार आहे. १ लाख रूपये रोख, स्मृती चिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुभेदार म्हणाले, प्रा. पुष्पा भावे यांना सामाजिक क्षेत्रातील असामान्य कामगिरीबद्दल आणि राजर्षि शाहू महाराजांच्या विचारांचा कृतिशील वारसा चालू ठेवल्याबद्दल तसेच समाजप्रबोधनाच्या वाटचालीमध्ये दीर्घकाळ दिलेल्या मौलिक योगदानाचा सन्मान म्हणून त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, शाहू महाराजांनी महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधातही खंबीर लढा उभारला होता. केवळ भारतात नव्हे तर युरोपमध्येही अस्तित्वात नसलेला कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा १00 वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी राबवला होता. प्रा. भावे यांनी विविध लढे उभारले. त्यातही त्यांनी महिलांवरील अन्यायाविरोधात विशेष भूमिका घेतली. म्हणून त्यांचा हा गौरव करण्यात येत आहे.
उच्चशिक्षित असणाऱ्या प्रा. भावे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून शाहीर अमर शेख यांच्या सान्निध्यात लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाच्या कार्यास सुरूवात केली. गोवा मुक्ती आंदोलनात सक्रीय सहभाग घेतलेल्या भावे यांनी समताधिष्ठित व धर्मनिरपेक्ष समाज बांधणीसाठी जीवन समर्पित केले आहे.
दलित, कामगार, शोषित व महिलांच्यावतीने त्यांनी प्रस्थापितांविरोधात अनेक लढे दिले. पत्रकार परिषदेला ट्रस्टचे सचिव, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे उपस्थित होते.
शाहूंच्या नावच्या पुरस्काराने आनंद
राजर्षि शाहू महाराजांच्या नावे असलेला हा पुरस्कार कोल्हापूरमधून मला जाहीर झाला याचा निश्चितच आनंद आहे. शाहू महाराजांच्या नावामुळेच हा पुरस्कार मोठा आणि महत्वाचा बनला आहे. मी जे शक्य होतं ते छोटं काम सातत्याने करत राहिले. माझ्या हातून फार मोठी कामगिरी झाली असे नाही. परंतू यानिमित्तानं पुन्हा एकदा त्या विचारांचा जागर होतो हे महत्वाचे आहे.