कोल्हापूर : कूळहक्काचा वाद तब्बल ४६ वर्षांनी तडजोडीने मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 03:54 PM2018-12-12T15:54:48+5:302018-12-12T15:56:38+5:30
नाटोली (ता. शिराळा, जि. सांगली) येथील कूळहक्काच्या दोन हेक्टर जमिनीचा तब्बल ४६ वर्षे सुरू असलेला दावा कोल्हापुरात महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणासमोर तडजोडीने मिटला. न्यायाधिकरणाचे सदस्य एम. एम. पोतदार यांच्यासमोर हा निर्णय झाला. त्यानंतर ही माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोल्हापूर : नाटोली (ता. शिराळा, जि. सांगली) येथील कूळहक्काच्या दोन हेक्टर जमिनीचा तब्बल ४६ वर्षे सुरू असलेला दावा कोल्हापुरात महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणासमोर तडजोडीने मिटला. न्यायाधिकरणाचे सदस्य एम. एम. पोतदार यांच्यासमोर हा निर्णय झाला. त्यानंतर ही माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नाटोली येथील शिवाजी एकनाथ कुलकर्णी यांची दोन हेक्टर जमीन ही चेंदू राऊ कुरणे हे कसत आहेत. कुरणे व कुलकर्णी या दोघांमध्ये १९७२ पासून या कूळहक्काच्या जमिनीसंदर्भात महसूल न्यायाधिकरणात दावा सुरू आहे.
या जमिनीच्या किमतीहून अधिक खर्च या दाव्याच्या माध्यमातून झाला, असे म्हणणे चुकीचे होणार नाही; कारण सुरुवातीला कुरणे यांच्यासोबत ५० अर्जदार झाले; तर दुसऱ्या बाजूला शिवाजी कुलकर्णी यांच्यासोबत पाच अर्जदार समाविष्ट झाले.
एकूण ५६ अर्जदारांचे हे प्रकरण अद्याप मिटले नव्हते; परंतु न्यायाधिकरणाचे सचिव पोतदार यांच्यासमोर मंगळवारी याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होऊन हा विषय तडजोडीने संपला.
यामध्ये १ लाख ८ हजार ६२० रुपये हे मूळ मालकांना कूळ असलेल्या कुरणे यांनी दिले. त्यामुळे बरीच वर्षे ताणलेला हा दावा चांगल्या प्रकारे संपल्याचा नि:श्वास पोतदार यांनी व्यक्त केला.
अशा प्रकारे कूळहक्काचे वाद हे अहंकाराचे व प्रतिष्ठेचे न करता लोकांनी सामंजस्याने सोडविल्यास वेळ, पैसा व मानसिक त्रास वाचेल, असे पोतदार यांनी सांगितले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते.
वर्षभरात १२० प्रकरणे निकाली
महसूल न्यायाधिकरण हे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांसाठी आहे. या प्राधिकरणाकडे सुमारे १५०० प्रकरणे दाखल असून, त्यांपैकी वर्षभरात १२० प्रकरणे निकाली निघाली आहेत, असे पोतदार यांनी सांगितले.