कोल्हापूर : शिष्यवृत्ती परीक्षेत राधानगरी तालुका राज्यात 'लय भारी '
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 03:18 PM2018-08-09T15:18:50+5:302018-08-09T15:26:08+5:30
शिष्यवृत्ती परीक्षा पॅटर्न मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्याने पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण केला आहे.
श्रीकांत ऱ्हायकर
कोल्हापूर/धामोड : शिष्यवृत्ती परीक्षा पॅटर्न मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्याने पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण केला आहे.
कोल्हापूर जिल्हयाबरोबर राज्यातही शिष्यवृत्ती पॅटर्न मध्ये सवतःचा वेगळा ठसा उमठवत आम्हीच ' लय भारी ' असल्याचे तालुक्यातील शिक्षकांनी सिध्द करून दाखवले दाखवत, पाचवीतील ७५ तर आठवीतील ७४ असे १४९ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरवले आहेत .
महाराष्ट्रराज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राधानगरी तालुक्याने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावत,तालुक्यातील विविध शाळेतील १४९ विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
राधानगरी तालुका हा तसा ग्रामीण, दुर्गम व डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो . शहरी भागाच्या तुलनेत आजही म्हणाव्या तितक्या शैक्षणिक सेवा सुविधा तालुक्याच्या बहुतांशी भागात पोहचलेल्याच नाहीत. पण तरीही उपलब्ध शैक्षणिक सुविधांचा वापर करून येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केले आहे ते खरोखरच राधानगरी शिक्षण पॅटर्नची चमकदार कामगिरी निर्देशित करणारे आहे.
राधानगरी तालुक्याची ओळख ही तशी पाणी व पर्यटन दृष्टया समृध्द तालुका एवढीच मर्यादीत. पण गेल्या पाच -सहा वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यात तालुक्याला या वर्षी मोठे यश आले आहे.
तालुक्याने यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात आघाडी घेत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तालुक्याच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत चमकण्याचा मान मिळवत आप- आपल्या शाळांचेही नाव राज्य गुणवत्ता यादीत कोरले आहे .
राधानगरी तालुक्याने गेली पस्तीस वर्षे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन करण्याचा प्रयत्न कायम ठेवला आहे. सराव परीक्षा, रचनावादी अध्यापन, नवीन तंत्रे, गट चर्चा, ज्ञान रचनावादी अभ्यासक्रम या तंत्रांचा वापर करून तालुक्यातील शिक्षकांनी स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे. शिक्षकांनी घेतलेल्या या मेहनतीमुळे पालक वर्गातून समाधान केले जात आहे.
राधानगरी तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेची परंपरा व राज्यात वेगळा दबदबा निर्माण करण्यामध्ये शिक्षक व विद्यार्थी वर्गाचे मोठे योगदान आहे व याचा मलाही अभिमान आहे .
डी.ए.पाटील
प्रभारी गट शिक्षणाधिकारी, राधानगरी.
शिष्यवृत्ती परिक्षेत राधानगरी सारख्या ग्रामीण भागातील मुलांनी उपलब्ध साधन सामुग्रीचा बळावर मिळवलेले यश आमच्या साठी निस्थितच एक वेगळी उर्जा निर्माण करणारे आहे .
रणजीत रेडेकर
( अध्यापक -वि. मं . खामकरवाडी )