कोल्हापूर : ‘गोविंदा’च्या गजरात राघवेंद्र स्वामींचा रथोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 05:33 PM2018-08-29T17:33:30+5:302018-08-29T17:40:33+5:30
‘गोविंदा... गोविंदा’च्या जयघोषात बुधवारी श्री राघवेंद्र स्वामींचा आराधना महोत्सव झाला. यानिमित्त शहरातील प्रमुख मार्गांवरून रथोत्सव काढण्यात आला.
कोल्हापूर : ‘गोविंदा... गोविंदा’च्या जयघोषात बुधवारी श्री राघवेंद्र स्वामींचा आराधना महोत्सव झाला. यानिमित्त शहरातील प्रमुख मार्गांवरून रथोत्सव काढण्यात आला.
श्री राघवेंद्र स्वामींच्या आराधना महोत्सवांतर्गत महाद्वार रोड येथील मंदिरात विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत रोज पहाटे सुप्रभातम, निर्माल्य विसर्जन, पाद्यपूजा, अष्टोत्तर पारायण, फलपंचामृत अभिषेक, कनक महापूजा, प्रवचन, नैवेद्य, हस्तोदक, मंगलारती, सेवा, अष्टावधान, स्वस्तिवचन, महामंगलारती हे नित्य विधी करण्यात आले. आराधना महोत्सवात उपकर्म, सत्यनारायण पूजा, गोपूजा, धान्यपूजा, लक्ष्मीपूजा, ध्वजारोहण, पालखी सेवा, स्वस्तिवचन हे धार्मिक विधी झाले.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू झालेल्या पूर्व आराधना महोत्सवात राधिका भजनी मंडळाचा संगीत कार्यक्रम, मध्य आराधनेत महाप्रसाद हे कार्यक्रम झाले. बुधवारी उत्तर आराधनाअंतर्गत सकाळी दहा वाजता रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी भजनी मंडळ व भक्त समुदायाच्या वतीने तालवाद्यांच्या गजरात व गोविंदाच्या नामघोषात काढण्यात आलेली ही मिरवणूक न्यू महाद्वार रोड, जोतिबा रोड, सरलष्कर भवनमार्गे पुन्हा मठात विसर्जित झाली. यावेळी के. रामाराव, पी. ए. जोशी, मयूर कुलकर्णी यांच्यासह भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.