कोल्हापूर : राहुल गांधीही माझीच उमेदवारी जाहीर करतील : धनंजय महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 11:28 AM2018-10-16T11:28:06+5:302018-10-16T11:29:17+5:30
चांगल्या उमेदवाराला सर्वच पक्षांतून मागणी असते; त्यामुळे यदाकदाचित कोल्हापूर मतदारसंघ कॉँग्रेसकडे गेला, तर पक्षाध्यक्ष राहुल गांधीही माझीच उमेदवारी जाहीर करतील, त्यांनी माझे लोकसभेतील काम बघितले आहे. त्यांच्याशी माझे चांगले संबंध असून, ते सगळ्यांना दुरूस्तही करतील. असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
कोल्हापूर : चांगल्या उमेदवाराला सर्वच पक्षांतून मागणी असते; त्यामुळे यदाकदाचित कोल्हापूर मतदारसंघ कॉँग्रेसकडे गेला, तर पक्षाध्यक्ष राहुल गांधीही माझीच उमेदवारी जाहीर करतील, त्यांनी माझे लोकसभेतील काम बघितले आहे. त्यांच्याशी माझे चांगले संबंध असून, ते सगळ्यांना दुरूस्तही करतील. असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर माझी निष्ठा व श्रद्धा असल्याने ‘राष्ट्रवादी’ची उमेदवारी मला मिळणार यात शंका नाही, तरीही स्थानिक अडचणी आल्या, तर मी कोणत्या पक्षातून लढायचे हाही निर्णय पवार हेच घेतील, अशी गुगलीही त्यांनी टाकली.
धनंजय महाडिक म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, ताराराणी आघाडीसह सर्वच घटकांनी मला मदत केल्याने २०१४ च्या ऐतिहासिक निवडणुकीत विजयी झालो आणि त्या संधीचे सोने केले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे आणली, त्याचबरोबर सलग दुसऱ्या वर्षी ‘संसदरत्न’ म्हणून पुरस्कार पटकाविला. यासाठी शरद पवार यांचे पाठबळ मोलाचे राहिले.
गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत राजेश लाटकर व आर. के. पोवार या मित्रांनी नाराजी व्यक्त केली. महापालिका निवडणुकीतील त्यांच्या पराभवाला मला जबाबदार धरणे योग्य नाही. लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांच्या लोकांनी मदत केल्याने महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाग घेतला नाही; त्यासाठी आपण पक्षाध्यक्ष पवार यांची परवानगी घेतली होती.
महापालिका निवडणुकीतील पराभवाबद्दल लोकसभेची उमेदवारी देऊ नका म्हणणे आणि ते पक्ष किती स्वीकारतो, हे मला माहिती नाही; पण पक्षाध्यक्ष पवार यांनी आपण संसदेत वरचष्मा निर्माण केलेला त्यांनी पाहिले आहे. पवार यांचे माझ्यावर प्रेम असल्याने ते माझीच उमेदवारी जाहीर करतील.
स्थानिक पातळीवर विरोध असेल तर तो हाताळण्याची क्षमता पवार यांच्याकडे आहे. तरीही अडचणी वाढल्या, तर मी कोणत्या पक्षातून उभे राहावे, हेही तेच सुचवतील, असेही महाडिक यांनी सांगितले. हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे. मध्यंतरी दुसऱ्याची उमेदवारी जाहीर करून त्यांना मदत करू, असे म्हटले होते, त्यांच्या मनात काय चाललेले आहे, हे सांगता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
तर मग पक्षाचे काम कसे करायचे?
अलीकडे वर्ष-दीड वर्षापासून पक्षाच्या कार्यक्रमाला आपणाला निमंत्रण दिले जात नाही. संजय मंडलिक यांची उमेदवारी जाहीर केल्यापासून ही मंडळी डावातच घेत नाहीत, मग पक्षाचे काम कसे करायचे? तरीही युवा शक्ती, भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविले आहेत.
भाजप उमेदवारीबाबत मौन!
राष्ट्रवादीतून उमेदवारी डावलली तर भाजपमधून लढणार का? असे विचारले असता, आज सांगत नाही. मतदारसंघ मोठा असल्याने उमेदवारी लवकर जाहीर करण्याची आमची मागणी असून पक्षाध्यक्ष पवार यांना अडचण आली, तर थेट जनतेच्या दरबारात जाऊन त्यांनाच विचारून दिशा ठरवू; पण २०१९ चा खासदार आपणच असू, असेही महाडिक यांनी सांगितले.
आताच महाडिक कुटुंबाबद्दल राग का?
आर. के. पोवार व राजेश लाटकर हे ताराराणी आघाडीच्या माध्यमातूनच राजकारणात आले. महादेवराव महाडिक यांच्यामुळेच आपण महापौर झाल्याचे आर. के. पोवार सांगतात, मग आताच महाडिक कुटुंबाबद्दल राग का? असा सवाल धनंजय महाडिक यांनी केला.