कोल्हापूरच्या रेल्वे समस्या मार्गी लावू, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 11:51 AM2024-05-20T11:51:50+5:302024-05-20T11:52:58+5:30

महाराष्ट्र रेल्वे व रोड पॅसेंजर्स असोसिएशनने घेतली भेट

Kolhapur railway problems will be resolved, Minister of State for Railways Raosaheb Danve assured | कोल्हापूरच्या रेल्वे समस्या मार्गी लावू, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आश्वासन

कोल्हापूरच्या रेल्वे समस्या मार्गी लावू, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आश्वासन

कोल्हापूर : महाराष्ट्र रेल्वे व रोड पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुहास गुरव आणि उपाध्यक्ष शिवनाथ बियाणी यांनी रविवारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी कोल्हापूर दौऱ्यात कोल्हापूरच्या रेल्वे प्रवासी सेवेतील सुधारणांबाबत चर्चा केली. वंदे भारत रेल्वे कोल्हापुरातून लवकरच मार्गस्थ होईल, असेही आश्वासन दानवे यांनी यावेळी दिले.

रेल्वे राज्यमंत्री दानवे रविवारी कोल्हापुरात होते. यावेळी महाराष्ट्र रेल्वे व रोड पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुहास गुरव आणि उपाध्यक्ष शिवनाथ बियाणी यांनी कोल्हापुरातील रेल्वे प्रवासी सेवेबाबत त्यांच्याशी चर्चा केली. कोल्हापूर रेल्वे स्टेशन हे छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर स्टेट रेल्वे या नावाने १८९१ मध्ये कोल्हापूर संस्थानच्या खर्चाने उभारून कोल्हापूर ते मिरज मीटर गेज रेल्वेमार्गाची उभारणी केली, त्यामुळे कोल्हापूरच्या शैक्षणिक, औद्याेगिक, कृषी उद्योग, व्यापार व्यवसायाच्या विकासाचे नवे महाद्वार खुले झाले. त्यामुळे सध्या या स्थानकाच्या विस्तारीकरणाचे संथ काम लवकर पूर्ण करावे, कोविड काळात रद्द केलेली कोल्हापूर ते मुंबई ही सह्याद्री एक्स्प्रेस गाडी सध्या पुण्यापर्यंत धावते. 

जूनमध्ये मुंबईच्या सीएसटीचे प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण होत आहे, त्या वेळेपर्यंत ती पूर्ववत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सुरू करावी, कोल्हापूर ते मुंबई मार्गावर बहुप्रतीक्षित वंदे भारत एक्सप्रेस सत्वर सुरू करावी, या गाडीला हिरवा झेंडा दाखवून त्याचे उद्घाटन आपल्या हस्ते करावे, कोल्हापूर ते नागपूरदरम्यान धावणाऱ्या मिरज ते कुर्डूवाडी मार्गे धावणारी द्विसाप्ताहिक रेल्वे रोज सोडावी, सांगली मिरज, परळी, वैजनाथ या गाडीचा प्रवास रात्रीचा असून त्याला किमान ६ शयनयान डबे जोडावेत, यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात भर पडणार आहे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करू, असे आश्वासन दानवे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

Web Title: Kolhapur railway problems will be resolved, Minister of State for Railways Raosaheb Danve assured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.