कोल्हापूर रेल्वे स्टेशन ‘मॉडेल’म्हणून होणार विकसित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 11:32 AM2018-09-08T11:32:03+5:302018-09-08T11:38:12+5:30
कोल्हापूर रेल्वे स्टेशन मॉडेल स्टेशन म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. पुणे येथे शुक्रवारी विभागीय रेल्वे मंडळातील खासदारांची बैठक झाली. त्यामध्ये महाडिक यांनी ही मागणी केली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूररेल्वे स्टेशन मॉडेल स्टेशन म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. पुणे येथे शुक्रवारी विभागीय रेल्वे मंडळातील खासदारांची बैठक झाली. त्यामध्ये महाडिक यांनी ही मागणी केली आहे.
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी या बैठकीमध्ये पाच जिल्ह्यातील रेल्वेविषयक कामकाजाचा आढवा घेतला. या बैठकीला महाडिक यांच्यासह संजयकाका पाटील, खासदार उदयनराजे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते.
या बैठकीत खासदार महाडिक यांनी प्रस्तावित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाच्या सध्याच्या स्थितीबाबत विचारणा केली. या मार्गाचे काम आय. पी. आर. सी. एल. या कंपनीच्या माध्यमातून होणार असून, सध्या या मार्गाचा अभ्यास सुरू असल्याचे डी. के. शर्मा यांनी सांगितले.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या धर्तीवर कोल्हापूर स्थानकाचा विकास व्हावा, अशी अपेक्षा महाडिक यांनी व्यक्तकेली.
राजारामपुरीच्या बाजूला तिकीट बुकिंग व्यवस्था, स्वयंचलित जिना, स्थानकावरील प्रतीक्षा कक्षाचे काम नोव्हेंबर अखेर पूर्ण होणार असून प्लॅटफॉर्मवर शेड मारणे आणि अन्य कामं कोल्हापूर स्टेशनवर सुरू असल्याचे सांगण्यात आले.
गुडस् यार्डमध्ये येणारा माल उतरवण्यासाठी खूप वेळ जातो. परिणामी कोल्हापुरातून साखर पाठवताना विलंब होतो. साखर हा नाशवंत माल असल्याने तो लवकरात लवकर रवाना करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक सुधारणा कराव्यात आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ३-४ वर शेड उभी करावी, प्रत्येक स्थानकावर वैद्यकीय व्यवस्था ठेवावी, अशा सूचना महाडिक यांनी केल्या.
कोल्हापूर- मिरज मार्गावरील विद्युतीकरणाचं काम नोव्हेंबर २०२२ अखेर, तर दुहेरीकरणाचे काम मार्च २०२४ अखेर पूर्ण होईल, असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.