पुराचा वेढा ओसरत नाही तोच पुन्हा कोल्हापुरात रात्रभर जोरदार पाऊस; राधानगरीचे सात दरवाजे उघडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 08:27 AM2024-07-31T08:27:18+5:302024-07-31T08:43:38+5:30
Kolhapur Rain Update : रात्रिपासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे, यामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
Kolhapur Rain Update ( Marathi News ) : काल रात्रिपासून राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून राधानगरी धरण्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडले आहे. धरणातून सध्या नदी पात्रात ११,५०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरणाचे आधी फक्त दोनच दरवाजे उघडले होते. दरम्यान, आथा पहाटे ४.५० ते ५.५० वाजेच्या दरम्यान पाच स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.
पुण्यात पुन्हा तसाच रात्रभर पाऊस कोसळतोय; खडकवासला, पानशेत धरणातून विसर्ग दुपटीने वाढविला
आज पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी ५ नंबर आणि ४.५३ वाजता ३ नंबर, ५.१६ वाजता ४ नंबर, ५.३३ १ नंबर, ५.५५ वाजता २ नंबरचे गेट उघडले. राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून आतापर्यंत १७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरणातून सध्या ११,५०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. यामुळे आता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता होती.
गेल्या चार दिवसापासून पावसाची उघडीप राहिली. त्यामुळे पाणी पातळी कमी होण्यास सुरूवात झाली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.
पुण्यातही जोरदार पाऊस
पुण्याच्या पुराला काही दिवसही उलटत नाहीत तोच पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभर पुणे आणि धरण परिसरात पाऊस कोसळत आहे. यामुळे पानशेत, खडकवासला धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होऊ लागली असून खडकवासल्यातून दुप्पट पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे. शिवणे नांदेड सिटीचा पूल पाण्याखाली गेला असल्याचे समजते आहे.
पानशेत धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे सकाळी ८.०० वा. पानशेत धरणाच्या सांडव्यावरून ६ हजार ६९३ क्यूसेक व विद्युत निर्मिती गृहद्वारे ६०० क्यूसेकसेक असा एकूण ७ हजार २९३ क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.