कोल्हापूर : गगनबावड्यात जोरदार पाऊस, उर्वरित जिल्ह्यात मात्र उघडझाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 05:33 PM2018-06-19T17:33:33+5:302018-06-19T17:33:33+5:30
गगनबावडा तालुक्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. उर्वरित जिल्ह्यात मात्र उघडझाप राहिली असून, अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या.
कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. उर्वरित जिल्ह्यात मात्र उघडझाप राहिली असून, अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या.
यंदा मान्सूनने वेळेवर हजेरी लावली असली तरी जोर दिसत नाही. ‘मृग’ नक्षत्र सुरू झाल्यानंतर दोन दिवस चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने थोडे दिवस दडी मारली. मृगाच्या पावसाने खरीप पिकांची उगवण चांगली झाली; पण मध्यंतरी पावसाने थोडी ओढ दिल्याने डोंगरमाथ्यावरील पिकांच्या वाढीवर थोडा परिणाम झाला.
दोन-तीन दिवसांनी पावसाचे पुनरागमन झाले आहे. गगनबावडा, चंदगड, शाहूवाडी, राधानगरी तालुक्यांत चांगला पाऊस आहे; पण उर्वरित तालुक्यांत उघडझाप सुरू आहे.
कोल्हापूर शहरात अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. सकाळपासून भुरभुर राहिली. त्यानंतर ऊन पडले आणि दुपारी दोन वाजता आकाश काळवंडून येऊन जोरदार सरी कोसळल्या.
मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ८.४२ मिलिमीटर पाऊस झाला. यामध्ये ४१.०० मिलिमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला.
तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये
हातकणंगले - ५.३३, शिरोळ - निरंक, पन्हाळा - ३.५७, शाहूवाडी - ८.१७, राधानगरी - ५.५०, गगनबावडा - ४१.००, करवीर - ६.००, कागल - १.४३, गडहिंग्लज - १.५७, भुदरगड - ९.६०, आजरा - ४.२५, चंदगड - १४.६६.