कोल्हापूर : ‘आरबीआय’च्या धोरणाविरोधात उठाव करा: विद्याधर अनास्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 02:24 PM2018-12-17T14:24:22+5:302018-12-17T14:25:53+5:30
कोल्हापूर : ‘आरबीआय’चे धोरण हे सहकाराला मारक आहे; त्यामुळे सहकारातील लोकांनी याविरोधात उठाव करावा, असा सल्ला राज्य सहकारी बॅँकेचे ...
कोल्हापूर : ‘आरबीआय’चे धोरण हे सहकाराला मारक आहे; त्यामुळे सहकारातील लोकांनी याविरोधात उठाव करावा, असा सल्ला राज्य सहकारी बॅँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी रविवारी येथे दिला. सहकारी बॅँकांनी आपल्यातील न्यूनगंड बाजूला ठेवून एकीची भावना बाळगावी, असेही त्यांनी सांगितले.
पेटाळा येथील राम गणेश गडकरी हॉल येथे कर्नाडस बॅँकिंग रिसर्च अॅँड डेव्हलपमेंट फौंडेशनतर्फे आयोजित सहकारी बॅँकिंग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रमुख उपस्थिती राज्य सहकारी बॅँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, माजी सहकार आयुक्त दिनेश ओऊळकर, अर्थतज्ज्ञ डॉ. विजय ककडे, कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अशोकराव सौंदत्तीकर, फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड, माधवी कर्नाड, आदींची होती. यावेळी अनास्कर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने परिषदेचे उदघाटन झाले.
अनास्कर म्हणाले, ‘आरबीआय’चे धोरण हे सहकाराला पोषक नसून ते मारक आहे. त्यामुळे याविरोधात आवाज उठवून आंदोलन करण्याची तयारी सहकारी बॅँकांनी केली पाहिजे.
बॅँकिंग हे खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांना समजेल अशा भाषेत असले पाहिजे. परंतु ‘आरबीआय’च्या लोकांना खरोखरच बॅँकिंग येतेय का असा प्रश्न पडतो.
सहकारी बॅँकांच्या सक्षमीकरणासाठी संचालकांनी आपापसांतील मतभेद चार भिंतींच्या आत ठेवावेत, निवडणुकीत एकमेकांवर आरोप करताना बॅँकेला लक्ष्य करू नका, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता माझी संस्था चांगली आहे याची शपथ संचालकांनी घेतली पाहिजे, असा सल्लाही अनास्कर यांनी यावेळी दिला.
विजय ककडे म्हणाले, सहकाराने नेहमीच दुसºयांना मदतीची भूमिका घेतली आहे. परंतु चांगल्याचे कौतुक होत नाही. त्यामुळे सहकार आता दोलायमन स्थितीत असल्याचे दिसत आहे.
ओऊळकर म्हणाले, ‘आरबीआय’ची धोरणे ही सहकाराविरोधात आहेत. परंतु आता सतीश मराठे यांच्या रूपाने ‘आरबीआय’मध्ये सहकाराची बाजू मांडणारा मराठी माणूस गेल्याने सहकाराविषयक गैरसमज नक्कीच दूर होण्यास मदत होईल.
‘एनपीए’चे निकष बदलावेत
‘एनपीए’चे निकष येण्यापूर्वी कुठली बॅँक बुडली होती काय? असा प्रश्न उपस्थित करत आपल्या सोयीनुसार ‘आरबीआय’कडून त्याची अंमलबजावणी झाली असून खरोखरच त्याचा अभ्यास झाला काय हे पाहण्याची गरज आहे. त्यामुळे आता ‘एनपीए’चे निकष बदलण्याची गरज असल्याचे अनास्कर यांनी सांगितले.
वार्षिक सभेत संचालक आरोपीच्या पिंजऱ्यांत
सहकारातील वार्षिक सभा म्हणजे संचालकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे असाच आहे. तसेच हे संचालकही वर्षातील दोन तास सभेसाठी देऊन ती कशी हाताळायची या अविर्भावात असतात. ‘गोकुळ’ची सभा काही मिनिटात गुंडाळल्याने पुन्हा हेच घडल्याचे अनास्कर यांनी सागिंतले.