रंकाळावेश ‘गोल सर्कल’च्या कोल्हापूरच्या राजाचे जल्लोषात आगमन
By संदीप आडनाईक | Published: August 5, 2024 12:03 AM2024-08-05T00:03:34+5:302024-08-05T00:03:50+5:30
वाहतूककोंडीमुळे विघ्नहर्त्याच्या स्वागताला विघ्न : पोलिसांची तारांबळ
कोल्हापूर - ढोल-ताशांचा गजर…नेत्रदीपक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि हजारो कोल्हापूरकरांच्या साक्षीने रंकाळावेस येथील गोल सर्कल मित्रमंडळाच्या कोल्हापूरचा राजाच्या गणेशमूर्तीचे आगमन झाले. गणशोत्सवाला महिना बाकी असतानाच दरवर्षीप्रमाणे मंडळाने मुंबईहून ही गणेशमूर्ती आणली. रविवारी सायंकाळी बाप्पाच्या दर्शनासाठी कोल्हापूरकरांनी तावडे हॉटेल परिसरात मोठी गर्दी केली होती. तावडे हॉटेल परिसरातून जाणाऱ्या वाहनधारकांना मात्र वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. विघ्नहर्त्याच्या स्वागताला वाहतूककोंंडीमुळे विघ्न निर्माण झाले. यामुळे पोलिसांचीही मोठी तारांबळ उडाली.
कोल्हापूरमधील सार्वजनिक, तसेच समाजप्रबोधन गणेशोत्सवाची सुरुवात करणाऱ्या रंकाळवेश गोल सर्कल मित्रमंडळाचे हे यंदाचे १२ वे वर्ष आहे. लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळे यांनी ही मूर्ती बनवली आहे. ही मूर्ती प्रभावळीसह १४ फूट उंच आहे. मुंबईतील गणेश चित्र शाळेतून बाहेर निघणारा हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा राज्यातील पहिलाच गणपती आहे. लालबाग येथील गणेश कार्यशाळेतून ही मूर्ती रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तावडे हॉटेल चौकात आली. तेथे या मूर्तीचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. अनेक जण आपापल्या मोबाइलमध्ये मूर्तीची छबी टिपत होते. ढोल-ताशा पथक, विद्युत रोषणाईत गणेशमूर्ती कोल्हापूर शहरात आणण्यात आली. ही मूर्ती गणेश उत्सवाच्या आदल्या दिवशी रंकाळा स्टँड येथील मंडपात विराजमान होते.
विघ्नहर्त्याच्या आगमनामुळे वाहतुकीत विघ्न
विघ्नहर्त्याच्या आगमनामुळे तावडे हॉटेल येथील चौकात सायंकाळी चार वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांची, तसेच वाहनधारकांची मोठी गर्दी झाली. शहरातून गांधीनगर, शिरोली पुलाकडे जाणाऱ्या वाहनांमुळे, तसेच शहरात येणाऱ्या वाहनांमुळे सांगली फाटा, उजळाईवाडी, शिवाजी विद्यापीठ मार्गापर्यंत वाहतुकीत विघ्न निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी मार्केट यार्ड परिसरात दुतर्फा दुचाकी लावल्या होत्या. शहर पोलिसांनी सांगली फाट्याकडे येणारी वाहने ताराराणी चौकातूनच उजळाईवाडीकडे महामार्गावरून पाठविली, तर फाट्याकडून येणारी वाहतूक एकेरी केली. महामार्गावरही अनेक जण थांबल्याने येथील वाहतूकही विस्कळीत बनली.
साउंड सीस्टिमचा दणदणाट थांबविला
पोलिसांचा चार वाजल्यापासूनच तावडे हॉटेल परिसरात कडक बंदोबस्त होता. डीवायएसपी सुजीत क्षीरसागर, अजित टिके यांच्यासह २० पोलिस अधिकारी आणि २०० पोलिसांचा फौजफाटा बंदाेबस्ताला होता. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन साउंड सीस्टिम असलेली वाहने गणेशमूर्तीजवळ पोहोचूच दिली नाहीत. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मूर्ती तावडे हॉटेलजवळ आल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ढोल-ताशा पथक व इतर वाद्ये वाजविण्यास परवानगी दिली.