"बिंदू चौकात सांगतो, महाडिक भ्यालेत, भ्यालेत, भ्यालेत"; सतेज पाटलांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 05:46 PM2023-04-14T17:46:07+5:302023-04-14T17:46:50+5:30
या जिल्ह्यात महाडिकांनी दहशतीचं, गुंडगिरीचं राजकारण केले, २५ वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता. कदाचित पहिल्यांदा ताकदीने त्यांच्याविरोधात खंबीरपणे कोण लढत असेल तर ती लढाई मीच लढतोय असं त्यांनी सांगितले.
कोल्हापूर - मी १०० टक्के म्हणतो, बिंदू चौकातून सांगेन, महाडिक भ्यालेत, भ्यालेत, भ्यालेत. जर भ्यायले नसते तर छाननीत अर्ज बाद करण्याचे कारण काय होते? बाळा तू लहान आहे. मी घरातून बाहेर पडलो नाही. मी पुण्यात होतो. घरात असतो तर काय झाले असते हे जिल्ह्याने पाहिले असते. मला मारायला आलेत होते का असा खुलासा अमोल महाडिकांनी केला पाहिजे अशा शब्दात सतेज पाटलांनी इशारा दिला आहे.
जिल्ह्यात सध्या राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. या प्रचारात सतेज पाटील म्हणाले की, २५ वर्षाच्या राजकारणात मी पहिल्यांदा बघतोय, ७०-८० टक्के कामगार सहकारी संस्थेत नाराजी व्यक्त करत आहेत. मी गोकुळची निवडणूक लढवताना सगळ्या मतदारांनी मला सहकार्य केले. आम्ही राजकारणात आहोत. एखाद्या गावात गेलो तर माणसं डोळ्यात डोळे घालून बोलतात तेव्हा ते आपल्यासोबत असतात. डोळा चुकवायला लागले तर समजायचं आपला कार्यक्रम करणार हा अनुभव आहे. माणूस नजर चुकवायला लागला तर काहीतरी गणित बिघडलंय हे ओळखायचं असं त्यांनी सांगितले.
तर कुठल्याही परिस्थितीत परिवर्तन करायचे, आता हे सभासदांनी ठरवले आहेत. वातावरणात बदल दिसायला लागलाय. त्यामुळे २८ अर्ज छाननीत उडवण्याचे काम केले गेले. मालकांना आत्मविश्वास होता, कारभार स्वच्छ होता मग अर्ज बाद का केले? होऊ द्यायची लढाई, उमेदवार लढले असते, १२ हजार सभासदांनी निर्णय घेतला असता. उमेदवारांना निवडणुकीत उभेच राहू द्यायचे नाही हे षडयंत्र करण्याची गरज होती असं मला वाटत नाही असा आरोपही सतेज पाटलांनी केला.
दरम्यान, या जिल्ह्यात महाडिकांनी दहशतीचं, गुंडगिरीचं राजकारण केले, २५ वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता. कदाचित पहिल्यांदा ताकदीने त्यांच्याविरोधात खंबीरपणे कोण लढत असेल तर ती लढाई मीच लढतोय. बंटी पाटलांचे उपकार २००५ साली मी आमदार होतो हे वडिलांना आणि आईंना जाऊन विचार, मग माझ्या विरोधात बोलण्याचे धाडस तुझे होणार नाही असा इशारा अमोल महाडिक यांना इशारा दिला.
महाडिक विश्वासघातकी
२०१४ ची निवडणूक मुन्ना महाडिकांची बघितली, राष्ट्रवादीसोबत लढतोय, मोदी लाटेत कुठल्याही परिस्थितीत खासदार निवडून आले पाहिजे तेव्हा सर्वकाही विसरून त्यांना खासदार बनवले. लोकसभेत सहकार्य केले आणि ऑक्टोबरमध्ये माझ्याविरोधात उमेदवार देण्याची भूमिका त्यांनी घेतली. मदत केलेल्या माणसाला ताबडतोब पाठीत खंजीर खुपसण्याचं काम महाडिक करतात. माझ्यासारख्याला फसवतात तर सभासदांनाही जाता जाता फसवतील. या जिल्ह्यात एक असा माणूस नसेल ज्यांचा विश्वासघात महाडिकांनी केला नसेल असं सतेज पाटलांनी म्हटलं.
...तर १ लाख बक्षीस देऊ
ज्या पायरीवरून हे वरती गेले त्या पायरीला लाथ मारायचं काम महाडिकांनी केले. प्रत्येकाला वापरून घेण्याचं काम महाडिकांनी केले. जे तत्व मला पटले नाही त्यामुळे गेल्या १० वर्षापासून सातत्याने त्यांच्याविरोधात लढा देतोय. हा जिल्हा स्वाभिमानी आहे. कुणाच्या मागे जाणारा नाही. सामान्य माणसाचा विश्वास मिळवायचं काम बंटी पाटलांनी केले आहे. तुमचे कर्तृत्व काय? २८ वर्ष राजाराम कारखाना तुम्ही ताब्यात ठेवला? १० सभासदांची घरे ओळखावी १ लाख रूपये बक्षीस देतो. संचालक वारला तरी त्याच्या घरी भेटायला गेले नाहीत. सभासदांना न्याय का दिला नाही? असा सवालही सतेज पाटलांनी सभेत विचारला.