कोल्हापूर : राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा, सहसंचालक कार्यालयावर विराट मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 07:18 PM2018-02-17T19:18:49+5:302018-02-17T19:40:44+5:30
हंगाम सुरू होण्यापुर्वीच्या समझोत्यात ठरल्याप्रमाणे ऊसाची पहिली उचल द्या अन्यथा साखर कारखानदारांना फिरणे मुश्कील करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला. साखर कारखानदार व व्यापाऱ्यांच्या संगनमताने साखरेचे दर पाडले, त्यामुळे गेले दोन महिन्यातील साखर खरेदी व विक्रीची चौकशी करण्याची मागणी आयकर विभाग, ‘ईडी’, ‘सीबी’ कडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर : हंगाम सुरू होण्यापुर्वीच्या समझोत्यात ठरल्याप्रमाणे ऊसाची पहिली उचल द्या अन्यथा साखर कारखानदारांना फिरणे मुश्कील करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला. साखर कारखानदार व व्यापाऱ्यांच्या संगनमताने साखरेचे दर पाडले, त्यामुळे गेले दोन महिन्यातील साखर खरेदी व विक्रीची चौकशी करण्याची मागणी आयकर विभाग, ‘ईडी’, ‘सीबी’ कडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
साखरेचे दर घसरल्याने कारखान्यांनी शेतकरी संघटनेबरोबर झालेल्या समझोता बाजूला ठेवून प्रतिटन २५०० रूपये उचल देण्यास सुरूवात केली आहे. त्याला विरोध करत कारखान्यांवर कारवाईच्या मागणीसाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
दुपारी तीन वाजता दसरा चौकातून मोर्चास सुरूवात झाली. सीपीआर मार्गे, महापालिका चौक, शिवाजी पुतळा, बिंदू चौक मार्गे सहसंचालक कार्यालयावर आला. तिथे सभेत रूपांतर झाले. यावेळी सर्वच वक्तयांनी साखर कारखानदारांसह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांना मागण्यांचे निवेदन दिले.
राजू शेट्टी म्हणाले, देशातील साखरेच्या उत्पादनाची माहिती संकलत करण्याची यंत्रणा केंद्र सरकारकडे नाही, ‘इसमा’, ‘दसमा’, साखर संघानी दिलेल्या माहितीच्या आधारेच धोरण ठरविले जाते. दुर्देवाने या यंत्रणेकडून खरी माहिती न दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. कारखान्यांच्या फायद्यावेळी उत्पादनाचे आकडे फुगवून सांगायचे आणि त्यांचा स्वारस्य संपला की दुसरा आकडा काढायचा, असे मटक्याचे आकडेवारी काढण्याचे धंदे बंद करा.
साखरेचे दर जाणीवपुर्वक पाडले जात असून कारखान्यांच्या अध्यक्षांनी दुसऱ्यांच्या नावावर कमी दराने खरेदी करायचे, साठेबाजी करून नंतर चढ्या दराने विक्री करण्याचे उद्योग सुरू आहेत. घाऊक बाजारात प्रतिकिलो २८ रूपये दर आणि किरकोळ बाजारात ३८ रूपये कसा? शेतकऱ्यांचे वाटोळे करून ग्राहकांचीही लुट सुरू आहे.
गेले आठवड्यात रिझर्व्ह बॅँकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी साखरेच्या कृत्रिम दर पाडण्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तीच मागणी आमची असून साखर दराचे तुणतुणे बंद करून प्रसंगी कर्जे काढा पण ठरल्याप्रमाणे आमचे पैसे द्या.
प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे, अनिल मादनाईक, सयाजी मोरे, विकास देशमुख यांची भाषणे झाली. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती शुभांगी श्ािंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.