कोल्हापूर : किसान सभेचा १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 05:29 PM2018-05-22T17:29:19+5:302018-05-22T17:29:19+5:30
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १ जून रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सभेचे जिल्हा सेक्रेटरी सुभाष निकम यांनी पत्रकातून दिली.
कोल्हापूर : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १ जून रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सभेचे जिल्हा सेक्रेटरी सुभाष निकम यांनी पत्रकातून दिली.
केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सरकारच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला असून, त्या विरोधात किसान सभेने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.
गेल्या वर्षी जून २०१७ रोजी राज्यातील शेतकरी संपावर गेले आणि सरकारने कर्जमाफीची घोषणा केली; पण अनेक निकष लादून कमीत कमी शेतकऱ्यांना लाभ कसा मिळेल, असेच धोरण राबविले.
शेतीमालाला दर नसल्याने शेतकरी अडचणीत आले. देवस्थान इनाम वर्ग ३ च्या जमिनी कसणाऱ्यांच्या नावे झाल्या पाहिजेत. दुधाला हमीभाव मिळाला पाहिजे, अशा विविध मागण्या आहेत. त्यासाठी ६ ते १२ मार्चपर्यंत ५० हजार शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई असा २०० किलोमीटर लॉँग मार्च काढला.
यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या सोडविण्याचे लेखी आश्वासन सरकारने दिले होते; पण अपेक्षित निर्णय न घेतल्याने पुन्हा शेतकऱ्यांना संपावर जाण्याची वेळ आली आहे. १ जून रोजी दुपारी बारा वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार असून, यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सुभाष निकम यांनी पत्रकातून केले.