गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात कोल्हापूर पोलीस लय भारी!, काय आहे, ‘सीसीटीएनएस’ प्रणाली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 11:10 AM2022-02-16T11:10:44+5:302022-02-16T11:12:39+5:30

पहिल्या क्रमाकाचे स्थानक जालना पोलीस दलाने पटकावले आहे

Kolhapur ranks second in investigating criminals | गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात कोल्हापूर पोलीस लय भारी!, काय आहे, ‘सीसीटीएनएस’ प्रणाली

गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात कोल्हापूर पोलीस लय भारी!, काय आहे, ‘सीसीटीएनएस’ प्रणाली

Next

तानाजी पोवार

कोल्हापूर : पोलीस विभागातील ‘सीसीटीएनएस’ (क्राईम क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टिम) प्रणालीचे मूल्यमापन गृहविभागाच्यावतीने करून त्याची गुणांकन यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यामध्ये गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात कोल्हापूर हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहे. त्यामध्ये पहिल्या क्रमाकाचे स्थानक जालना पोलीस दलाने पटकावले आहे.

पोलीस दलाचे कार्य गतिमान करण्यासाठी ‘सीसीटीएनएस’ प्रणाली अस्तित्वात आली. कोल्हापूर पोलीस दलाचे ऑगस्ट २०१६ ते जून २०१७ या मुदतीत २०१३-२०१५ सालातील दाखल २०,७३५ प्रथम खबरी अहवालाचे एकूण १ लाख ११ हजार ६३५ फॉर्म भरून ‘सीसीटीएनएस’चे शंभर टक्के डाटा डिजिटायजेशनचे काम पूर्ण केले. त्यामुळे प्रशासकीय कामात गतिमानता आली.

‘सीसीटीएनएस’ प्रशिक्षण देऊन जिल्ह्यातील अंमलदारांना प्रशिक्षित केले आहे. प्रणालीचे काम प्रभावीपणे चालविण्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे व नोडल ऑफिसर अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनासाठी ‘सीसीटीएनएस’ कक्ष स्थापन केला आहे. त्यामध्ये महिला पोलीस कविता पाटील, एल. पी. दंडगे, एस. डी. पाटील, जी. डी. जाधव, डी. बी. डावकुरे, पी. बी. गवंडी हे पथक कार्यरत आहे.

गुणांकनात कोल्हापूर पोलीस ९० टक्के अग्रेसर

महाराष्ट्रातील २०१९ मध्ये कोल्हापूर पोलीस दलाने जनरल चॅम्पियनशीपमध्ये दुसरा क्रमांक, सप्टेंबर २०२० मध्ये राज्यात ‘सीसीटीएनएस’मध्ये प्रथम क्रमांक, जुन-जुलै २०२१ मध्ये क्रमवारीत द्वितीय स्थान पटकावले आहे. त्यामुळे ‘सीसीटीएनएस’ प्रणालीच्या मूल्यांकनात कोल्हापूर पोलीस दलाने ९० टक्के गुण संपादन केले आहेत.

वर्षभरात १२ हजारांवर ऑनलाईन गुन्हे

२०२१ या वर्षभरात कोल्हापूर पोलीस दलाच्या ‘सीसीटीएनएस’ प्रणालीत सुमारे ११९४० ऑनलाईन गुन्ह्यांची नोद करण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रणाली गतिमान करण्यात या कक्षानेही गतिमानता घेतली आहे.

काय आहे, ‘सीसीटीएनएस’ प्रणाली

‘सीसीटीएनएस’ प्रणाली ‘आयसीजेसी’द्वारे आरोपींवर कोणत्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत, याची माहिती तत्काळ उपलब्ध होते. त्याची गुन्ह्याच्या पुढील तपासकामी मदत होते. एखाद्या व्यक्तीवर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असतील तर त्याची माहिती मिळते. बेवारस मिळालेल्या वाहनांच्या क्रमांकावरून कोणत्या पोलीस ठाण्यात चोरीची अगर त्यावर कोणता गुन्हा दाखल आहे, याची माहिती मिळते. बेवारस मयत, मिसिंग शोधण्यासाठी वापर होते. पासपोर्ट, चारित्र पडताळणीसाठी व्यक्तीवर गुन्हे दाखल असल्यास त्वरित माहिती मिळते.

‘सीसीटीएनएस’ प्रणालीमुळे कोल्हापूर पोलिसांचे प्रशासकीय काम गतिमान झाले आहे. गुन्हेगारांची माहिती त्वरित उपलब्ध होण्यासाठी या प्रणालीची मोठी मदत होत आहे. या प्रणालीतील कोल्हापूर कक्षाचे काम उत्तमपणे चालू आहे. - शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा.

Web Title: Kolhapur ranks second in investigating criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.