कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग होणार तीनपदरी ?

By admin | Published: April 27, 2015 11:38 PM2015-04-27T23:38:39+5:302015-04-28T00:31:33+5:30

राष्ट्रीय महामार्ग विभाग : १२ कोटी ४० लाखांची कामे मंजूर; मलकापूर पुलाचे रुंदीकरण; घाटरस्त्याचीही दुरुस्ती

Kolhapur-Ratnagiri route to be three-part | कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग होणार तीनपदरी ?

कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग होणार तीनपदरी ?

Next

शेखर धोंगडे - कोल्हापूर --राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ अंतर्गत सोलापूर-कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील विविध कामांसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने १२ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने वर्षभर रेंगाळलेल्या या महामार्गाच्या कामाला गती येणार आहे. यातील कोल्हापूर ते रत्नागिरी हा महामार्ग तिपदरीच्या दृष्टीने सर्व्हे करून प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील सांगली जिल्ह्यातील नागजपासून कोल्हापूर-रत्नागिरीपर्यंतचा महामार्ग गेल्यावर्षी पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या अखत्यारित देण्यात आला होता. हा रस्ता पुणे विभागाच्या नियंत्रणाखाली गेला होता. त्यामुळे या महामार्गावर भौगोलिक तसेच प्रशासकीयदृष्ट्या देखरेख व दुरुस्ती तसेच सनियंत्रण करणे अत्यंत गैरसोयीचे ठरत होते. परिणामी कामांना विलंब होत होता. सातत्याने अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या या विभागाला अनेकदा नागरिकांच्या तक्रारीला सामोरे जावे लागत होते.मात्र, २६ नोव्हेंबर २०१४ च्या नव्या शासन आदेशानुसार पुन्हा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग विभागाला हा मार्ग (लांबी) जोडण्यात आला. शिवाय सोलापूर-कोल्हापूर-रत्नागिरी असे अंतरही वाढविण्यात आले. याचबरोबरच स्वतंत्र अधिकार देण्यात आले. मार्च-एप्रिलमध्ये १२.४० कोटींची नवी कामेही मंजूर होऊन आली आहेत. त्यामुळे रत्नागिरी-कोल्हापूर-सोलापूर मार्गावरील अनेक कामांना गती येणार आहे.


कोल्हापूर-रत्नागिरी हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मार्ग आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीमुळे रेंगाळेलेली कामे आता जलदगतीने करता येतील. याचबरोबर कोल्हापूर येथून या मार्गावर देखरेख, सनियंत्रण करणे शक्य होईल, तसेच कामाचा दर्जा सांभाळता येईल.
- आर. के. बामणे,--कार्यकारी अभियंता  ,,राष्ट्रीय महामार्ग, कोल्हापूर


कोल्हापूर-मलकापूर-बांबवडेला ‘बायपास’
कोल्हापूर शहर, मलकापूर तसेच बांबवडे शहरातून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक जात असल्याने अनेकदा याचा ताण या शहरांना होत आहे. त्यामुळे शहराला पर्यायी मार्ग व वाहतुकीची समस्या सुटण्यासाठी कोल्हापूर, मलकापूर, बांबवडे या रस्त्यांना बायपास म्हणजेच वळणरस्ता काढण्याच्या दृष्टीने या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.


मार्च-एप्रिलमध्ये मंजूर झालेली कामे
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील मलकापूर नगरपरिषदेच्या हद्दीतील अरुंद पुलाच्या रुंदीकरणासाठी तीन कोटी २१ लाख ६ हजार रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच हे काम हाती घेतले जाणार आहे. या पुलाचे रुंदीकरण झाल्यास मलकापूर शहरावर पडणारा वाहतुकीचा ताण कमी होईल.
कोल्हापूर शहरापासून पंचगंगा नदीच्या पुढे केर्ली ते वडणगे येथे दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचा फुगवटा वाढल्याने कोल्हापूर-रत्नागिरी हा मार्ग बंद पडत असतो.यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून धापा ड्रेनेजची दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी ७० लाख ४३ हजार रुपये मंजूर झाले आहेत.
आंबा ते वारुळ अशा सुमारे १० किलोमीटर मार्गाच्या रुंदीकरण, डांबरीकरण तसेच अन्य दुरुस्तीसाठी चार कोटी ६१ लाख ४४ हजार रुपये मंजूर झाले आहेत.
मिरजजवळील भोसे येथे नवीन पुलासाठी ७० लाख ४३ हजार, तर याच मार्गावर आवश्यक तेथे नव्या मोऱ्या बांधण्यासाठी एक कोटी २१ लाख ९२ हजार रुपयांची तरतूद केली आहे.

Web Title: Kolhapur-Ratnagiri route to be three-part

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.