कोल्हापूर : रविकिरण इंगवले शिवसेनेत: ताराराणी आघाडीला सोडचिठ्ठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 03:59 PM2018-09-07T15:59:49+5:302018-09-07T16:03:30+5:30
कोल्हापूर महापालिकेचे माजी उपमहापौर रविकिरण विष्णूपंत इंगवले यांनी शुक्रवारी शिवसेना भवन मुंबई येथे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ते माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे कट्टर समर्थक असून त्यांनी ताराराणी आघाडीला सोडचिठ्ठी देऊन घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर : महापालिकेचे माजी उपमहापौर रविकिरण विष्णूपंत इंगवले यांनी शुक्रवारी शिवसेना भवन मुंबई येथे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ते माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे कट्टर समर्थक असून त्यांनी ताराराणी आघाडीला सोडचिठ्ठी देऊन घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर देत इंगवले यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित होते. क्षीरसागर यांच्या माध्यमातूनच हा प्रवेश झाला आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर यांनी आपली बाजू भक्कम व सुरक्षित करण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला आहे.
इंगवले हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे कट्टर समर्थक असूनही गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी थेट शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांना पाठींबा दिला होता. त्यानंतर त्यांची वाटचाल क्षीरसागरांसोबतच राहीली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी तेजस्विनी इंगवले या ताराराणी आघाडीच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. त्यातच इंगवले यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय धुरिणांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हा ताराराणी आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. इंगवले हे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय विष्णूपंत इंगवले यांचे चिरंजीव आहेत. तसेच त्यांनी यापूर्वी स्थायी समिती सभापती व उपमहापौरपदही भूषविले आहे.
शहरप्रमुखपदाची चर्चा
शिवसेना प्रवेशानंतर रविकिरण इंगवले यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इंगवले यांच्या मागे असलेले तरुण कार्यकर्त्यांचे जाळे पाहता त्यांना संघटनेतील मोठी जबाबदारी मिळू शकते. त्यामुळे त्यांच्या शहरप्रमुखपदाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.