कोल्हापूर : आरसी गँगच्या रवी शिंदेवर गुन्हा, भररस्त्यावर बहिणीला बेदम मारहाण प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:47 PM2018-04-02T12:47:26+5:302018-04-02T12:47:26+5:30
सुभाषनगर येथील भररस्त्यावर स्वत:च्या विवाहीत बहिणीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी आरसी गँगचा म्होरक्या रवी सुरेश शिंदे (रा. साळुंखे पार्क, कोल्हापूर) याचेवर राजारामपूरी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल झाला. मारहाणीत कौसर वसिम पखाली (वय २७) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना राजारामपूरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
कोल्हापूर : सुभाषनगर येथील भररस्त्यावर स्वत:च्या विवाहीत बहिणीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी आरसी गँगचा म्होरक्या रवी सुरेश शिंदे (रा. साळुंखे पार्क, कोल्हापूर) याचेवर राजारामपूरी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल झाला. मारहाणीत कौसर वसिम पखाली (वय २७) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना राजारामपूरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
अधिक माहिती अशी, कौसर हिने वसिम पखाली यांचेसोबत आंतरजातीय विवाह केला आहे. गेली आठ-नऊ वर्ष ती भाऊ रवी शिंदे व कुटूंबाच्या संपर्कात नाही. ती पती, व मुलांसह सुभाषनगर येथे राहते. घरच्यांच्या विरोधात लग्न केल्याने शिंदे बहिण कौसरवर चिडून होता.
शनिवारी रात्री घरासमोर कौसर ह्या मुलगा फाजेल यांचेसाबत घरासमोर बोलत बसली होती. यावेळी रवी शिंदेने याठिकाणी येवून लाकडी दांडक्याने बहिण कौसर हिला मारहाण केली. भररस्त्यावर मारहाण होत असताना शिंदे याच्या दहशतीमुळे पुढे कोणीच गेले नाही. अक्रम नदाम व नवाज जमादार यांनी कौसर हिला शिंदेच्या ताब्यातून सोडविण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यांनाही त्याने धमकी दिली.
येथील काही महिलांनी सामाजिक कार्यकर्त्या हसिना शेख यांना फोन करुन बोलवून घेतले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कौसर हिची सुटका केली. तेथून तिला राजारामपूरी पोलीसांच्या सांगण्यावरुन परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी तिचा पती वसिम इब्राहीम पखाली (२९) यांनी फिर्याद दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम करीत आहेत.