कोल्हापूर : बोलघेवड्या सरकारवर ‘हल्लाबोल’साठी सज्ज रहा, हसन मुश्रीफ यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 07:01 PM2018-03-31T19:01:44+5:302018-03-31T19:01:44+5:30
सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलनाची सुरुवात होणार असून, बोलघेवड्या सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापूर : केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकार नुसते बोलघेवडे असून, सामान्य माणसांच्या मनात कमालीचा संताप आहे. सामान्य माणसांच्या भावना घेऊन राष्ट्रवादी कॉँग्रेस संपूर्ण राज्यात हल्लाबोल आंदोलन करीत आहे.
सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलनाची सुरुवात होणार असून, बोलघेवड्या सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात सोमवारी कोल्हापुरातून होत आहे. त्याच्या तयारीसाठी कोल्हापूर शहर, करवीर, दक्षिण, पन्हाळा, शाहूवाडी व हातकणंगले तालुक्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी आयोजित केली होती. त्यामध्ये ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, हल्लाबोल मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीने बाहेर पडायचे आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता दसरा चौकात सभा होणार असून, कार्यकर्त्यांनी तिथे वाजत गाजत यायचे आहे.
जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. माजी महापौर आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर, जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, बाबूराव हजारे, शिवाजी देसाई, प्रकाश पाटील, आप्पासाहेब धनवडे, आदी उपस्थित होते.
यांच्या तोफा धडधडणार-
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, चित्रा वाघ, जितेंद्र आव्हाड.
हल्लाबोल सभा अशा होणार-
सोमवारी सकाळी साडेआठ वाजता अंबाबाई दर्शन, दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार, साडेदहा वाजता मुरगूड येथे सभा, दुपारी तीन वाजता गारगोटी येथे सभा, तेथून सायंकाळी सहा वाजता दसरा चौकात सभा होणार आहे. मंगळवारी (दि. ३) सकाळी दहा वाजता नेसरी (गडहिंग्लज) येथे सभा, ४.३० वाजता पत्रकार परिषद, सायंकाळी सहा वाजता जयसिंगपूर येथे सभा होणार आहे.