कोल्हापूर : कठीण काळात तग धरुण राहण्यातच खरी कसोटी : किशोर कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 05:02 PM2018-05-05T17:02:09+5:302018-05-05T17:02:09+5:30
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात कॉ. संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रत्यय नाट्य संस्थेच्यावतीने आयोजित प्रत्यय नाट्य महोत्सवांतर्गत शनिवारी झालेल्या रंगसंवाद कार्यक्रमात अभिनेते, कवी किशोर कदम यांनी रसिकांशी संवाद साधला.
कोल्हापूर : मी सत्यदेव दुबेंच्या तालमीत अभिनय शिकलो. नाटकापासून चित्रपटपर्यंतचा प्रवास सुरू असताना मधली पाच वर्षे माझ्याकडे एकही काम नव्हते. नैराश्य आणि वैफल्याने व्यसनाधीनतेच्या काठावर होतो, आत्महत्येचे विचार मनात यायचे या कठीण काळात तग धरुन राहण्यात खरी कसोटी होती. आणि मी यशस्वीपणे पार करू शकलो म्हणून आज तुमच्यापुढे आत्मविश्वासाने उभा आहे असे मनोगत अभिनेते, कवी किशोर कदम यांनी शनिवारी व्यक्त केले.
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात कॉ. संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रत्यय नाट्य संस्थेच्यावतीने आयोजित प्रत्यय नाट्य महोत्सवांतर्गत झालेल्या रंगसंवाद कार्यक्रमात त्यांनी नव्या पिढीशी संवाद साधला. यावेळी डॉ. शरद भुताडिया, रसिया पडळकर उपस्थित होत्या.
किशोर कदम म्हणाले, सत्यदेव दुबे रोज नवनवीन आव्हाने आणि निवडीचे पर्याय समोर ठेवायचे त्यावर निर्णय घेणे खूप अवघड असायचे. त्याच काळात मी नटसम्राट पदरात पाडून घेतला आणि डॉ. श्रीराम लागूंसोबत काम करण्याची संधी मिळाली. पुढे मला शरद जोशींच्या हिंदी साहित्याची आवड लागली. आनंदगौरी हे माझं आवडतं पुस्तक. अतुल पेठेंबरोबर चर्चा झाल्यानंतर आम्ही ते रंगमंचावर आणलं. गांधी विरुद्ध गांधी मधील हरीलाल मी रंगवला.
श्याम बेनेगल, अमोल पालेकर यांच्या चित्रपटांमध्ये काम केलो. पण त्यानंतरचा पाच वर्षांचा काळ माझी परीक्षा घेणारा होता. नंतर जोगवा आणि नटरंग चित्रपटांनी मला पून्हा या क्षेत्रात उभे केले. माझ्या पूर्वीच्या कविता या प्रेमकविता असायच्या आता नव्या कविता मात्र तुमच्यासमोर खूप वेगळ््या रुपात येतील. प्रकाश फडणीस यांनी त्यांची मुलाखत घेतली.
दुपारी मॅथेमॅजिशियन व रात्री सियाह मंटो ही नाटके सादर झाली.
रविवारी महोत्सवात
सकाळी दहा वाजता : अतुल पेठे यांच्याशी रंगसंवाद
दुपारी चार वाजता : विंदाक्षर ही विंदांच्या कवितांची मैफल आणि मधुचंद्र विरुपिका सादरीकरण
सायंकाळी सहा वाजता : परवा आमचा पोपट वारला (नाटक)