कोल्हापूर : पहिली मुलगी झाल्याच्या कारणातून विवाहितेचा छळ, पतीसह सातजणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:25 AM2018-11-17T11:25:16+5:302018-11-17T11:26:25+5:30
कोल्हापूर : पहिली मुलगी झाल्याच्या कारणातून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सातजणांवर करवीर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा ...
कोल्हापूर : पहिली मुलगी झाल्याच्या कारणातून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सातजणांवर करवीर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित पती अशोक आनंदराव यादव, सासू मालती आनंदराव यादव, सासरे आनंदराव गणपती यादव (तिघे रा. बालिंगा, ता. करवीर), नणंद अरुणा उमेश पाटील, तिचा पती उमेश बाबूराव पाटील, सविता विवेक चव्हाण, तिचा पती विवेक वसंत चव्हाण (सर्व रा. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, विवाहिता पूनम अशोक यादव (रा. बालिंगा) यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला. त्यांचे पती अशोक यादव हे कोल्हापुरातील एका खासगी संस्थेत कॅशिअर आहेत. विवाह झाल्यानंतर दोन वर्षांनी त्यांना मुलगी झाली. त्यामुळे पतीसह सासू-सासरे, नणंद व त्यांच्या पतींनी तिला खिजविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्वजण संगनमत करून तिचा मानसिक व शारीरिक छळ करू लागले.
चारित्र्यावर संशय घेत अंगावरील दागिने जबरदस्तीने काढून त्यांनी तिला माहेरी पाठविले. यावेळी दोन्ही मुलेही सासरी ठेवून घेतली. त्यांना भेटूही दिले जात नाही. या मानसिक तणावाखाली पूनम यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने माहेरच्या कुटुंबीयांनी त्यांना राजारामपुरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
यावेळी येथील डॉक्टरांसह नातेवाइकांनी अशोक यादव यांना ‘पूनमची प्रकृती जास्तच खालावली आहे. तुम्ही रुग्णालयात या,’ असा निरोप देऊनही सासरचे लोक तिकडे फिरकले नाहीत. त्यानंतर त्यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवून घटस्फोटासाठी तगादा लावला आहे.
पूनमच्या माहेरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. रोजच्या त्रासाला कंटाळून त्यांनी सासरच्या लोकांविरोधात पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणी सहायक फौजदार भगवान गिरिगोसावी अधिक तपास करीत आहेत.