कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी वळीव बरसला, तापमानाचा पारा उतरला
By संदीप आडनाईक | Published: April 20, 2024 06:09 PM2024-04-20T18:09:07+5:302024-04-20T18:10:31+5:30
नागरिकांची उडाली तारांबळ, हवेत गारवा
कोल्हापूर : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशीही वळीव पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पूर्व भागाला पावसाने झोडपून काढले होते. शुक्रवारी सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. दिवसभरातील उकाड्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अर्ध्या तासाहून अधिक वेळ पडलेल्या पावसाच्या सरींनी हवेत गारवा निर्माण केला.
ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याने काही भागात झाडांची पडझड झाली तर काही भागात रिमझिम पाऊस झाला. मागच्या काही दिवसांत पारा ३८ ते ४१ अंशापर्यंत पोहोचल्याने कोल्हापूरकर उकाड्याने हैराण होते. मात्र, शनिवारी जिल्ह्यात काही भागात वळीव पावसामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे. वादळी पावसाची हलकी सर पडून गेल्यानंतर काही वेळाने पाऊस थांबला.
दरम्यान, बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची विशेषतः महिलांची धावपळ झाली. विविध तालुक्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी थोडासा दिलासा मिळाला आहे. शनिवारी किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले असून, कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. दिवसभरातील तापमान सरासरी २३ अंश सेल्सिअसच्या आसपास होते.