कोल्हापूरकडे दुसऱ्यांदा आले वैद्यकीय शिक्षण खाते; मुश्रीफ यांचा जीव अडकला होता 'ग्रामविकास'मध्ये

By विश्वास पाटील | Published: July 15, 2023 01:02 PM2023-07-15T13:02:30+5:302023-07-15T13:02:52+5:30

कोल्हापूरशी संबंधित तीन मंत्र्यांकडे सध्या महाराष्ट्राला सगळे शिक्षण देण्याची जबाबदारी

Kolhapur received the medical education minister account for the second time; Hasan Mushrif wanted a Ministry of Rural Development | कोल्हापूरकडे दुसऱ्यांदा आले वैद्यकीय शिक्षण खाते; मुश्रीफ यांचा जीव अडकला होता 'ग्रामविकास'मध्ये

कोल्हापूरकडे दुसऱ्यांदा आले वैद्यकीय शिक्षण खाते; मुश्रीफ यांचा जीव अडकला होता 'ग्रामविकास'मध्ये

googlenewsNext

विश्वास पाटील 

कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या मंत्रीहसन मुश्रीफ यांच्या वाट्याला वैद्यकीय शिक्षण आणि अर्थसाहाय्य या खात्याची जबाबदारी पडली आहे. त्यांचा मात्र ग्रामविकास किंवा सहकार खाते मिळावे, यासाठी प्रयत्न होता. कोल्हापूर जिल्ह्यातील दिवंगत माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांनी यापूर्वी सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण खात्याचा (२००० ते २००४) कार्यभार सांभाळताना कोल्हापूरला शाहू महाराज यांच्या नावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. त्यांच्यामुळेच हे महाविद्यालय होऊ शकले.

मुश्रीफ यांनी यापूर्वी पशुसंवर्धन, दुग्धविकास राज्यमंत्रिपद, तर कामगार, विशेष साहाय्य. विधी न्याय, जलसंपदा आणि ग्रामविकासमंत्री म्हणून ठसा उमटविणारे काम केले आहे. त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. थेट जनतेशी संबंधित खाते मिळावे, यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यामुळेच त्यांना सहकार किंवा ग्रामविकास खाते हवे होते. त्यातही ग्रामविकाससाठीच ते जास्त प्रयत्नशील होते. हे खाते भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील नेते गिरीश महाजन यांच्याकडे आहे. त्यांच्याकडील वैद्यकीय शिक्षण खाते मुश्रीफ यांना देऊन ग्रामविकास त्यांच्याकडेच ठेवले आहे. त्यातही खातेवाटप करताना राष्ट्रवादी डोईजड होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. 

बांधकाम व्यावसायिकांकडून सेस घेऊन त्यातून बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याची योजना मुश्रीफ यांनीच सुुरू केली. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिंग महाविद्यालये व वैद्यकीय शिक्षणाचे धोरण निश्चित करण्याचे काम त्यांच्या नव्या खात्यातर्फे केले जाते. तसा विचार केल्यास नव्या पिढीच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे खाते आहे; पण त्यात रस दाखवून काम करायला हवे.

कोल्हापूरकडे सगळे शिक्षण...

कोल्हापूरशी संबंधित तीन मंत्र्यांकडे सध्या महाराष्ट्राला सगळे शिक्षण देण्याची जबाबदारी आली आहे. मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण ही खाती आली आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षण खाते मिळाल्यावर कोल्हापूरला नवीन अभियांत्रिकी मंजूर करून ते यावर्षापासून सुरूही केले आहे. मुश्रीफ यांनी मनावर घेतले तर शेंडा पार्कात वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोरच मंजूर असलेले शंभर खाटांचे नवीन रुग्णालय ते उभे करू शकतात. ‘सीपीआर’वरील ताण कमी करण्यासाठी या रुग्णालयाची गरज आहे.

डॉ. हसन मुश्रीफ

खानविलकर यांनी कोल्हापूरला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्यावर त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व नेते त्यांना डॉ. खानविलकर म्हणून गमतीने बोलवत असत. आता कोल्हापूरला डॉ. मुश्रीफ म्हणून नवे मंत्री मिळाले आहेत, अशीही चर्चा शुक्रवारी दुपारनंतर सोशल मीडियावर सुरू झाली. भैया माने, युवराज पाटील हे आता ॲपरन घालूनच वावरणार, अशीही टिप्पणी काहींनी केली.

Web Title: Kolhapur received the medical education minister account for the second time; Hasan Mushrif wanted a Ministry of Rural Development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.