कोल्हापूर : मेगाभरतीअंतर्गत जिल्हा परिषदेत ५६६ पदांची भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:06 PM2018-12-14T13:06:36+5:302018-12-14T13:08:37+5:30
राज्यभरातील ७२ हजार पदांच्या होणाऱ्या मेगाभरतीचा जिल्हानिहाय आढावा गुरुवारी राज्याचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांनी व्हीसीद्वारे घेतला. जिल्हा परिषदेत दुपारी झालेल्या व्हीसीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी माहिती देताना ५६६ पदांची भरतीची तयारी पूर्ण झाली असून, रोस्टर तपासणी अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट केले.
कोल्हापूर : राज्यभरातील ७२ हजार पदांच्या होणाऱ्या मेगाभरतीचा जिल्हानिहाय आढावा गुरुवारी राज्याचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांनी व्हीसीद्वारे घेतला. जिल्हा परिषदेत दुपारी झालेल्या व्हीसीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी माहिती देताना ५६६ पदांची भरतीची तयारी पूर्ण झाली असून, रोस्टर तपासणी अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट केले.
मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर मेगा भरतीची प्रक्रिया गतिमान झाली आहे. तातडीने सरकारने राज्यातील ३३ जिल्हा परिषदेतील रिक्त जागा व भरती होणाऱ्या जागांची सविस्तर माहिती बिंदू नामावलींसह देण्याचे आदेश दिले.
त्याचा आढावा प्रधान सचिव गुप्ता यांनी गुरुवारी दुपारी सर्व ३३ जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्हीसीद्वारे संपर्क साधून घेतला. यात सहा जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांनी, सर्व माहिती भरल्याचे निदर्शनास आले. तातडीने रोस्टर तपासून घेऊन यादी अद्ययावत करा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत या भरतीअंतर्गत ५६६ पदे भरली जाणार आहेत. यात महिला बालकल्याण, कृषी, पशूसंवर्धन, ग्रामपंचायत, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, बांधकाम, सामान्य प्रशासन या आठ विभागांतील विविध रिक्त पदांचा समावेश आहे.
पदांचा आकडा निश्चित झाला असला, तरी रोस्टरनुसार किती पदे कोणत्या आरक्षित प्रवर्गाला जाणार, याबाबत मात्र अजून माहिती तयार झालेली नाही. पुण्यात गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी रोस्टर अद्ययावत करून घेण्यासाठी काम करत आहेत.
हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे. दोन दिवसांत हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात आॅनलाईन पद्धतीने उर्वरित माहिती भरून शासनाच्या आदेशानंतर प्रत्यक्षात भरती सुरू होणार आहे.
भरतीच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी व्हीसीनंतर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्या दालनात जाऊन आणखी सविस्तर माहिती घेतली. स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारीच दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या दालनात गेल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
मित्तल यांची कार्यपद्धती खुलेपणाने काम करण्याची आहे. त्यामुळे काही महत्त्वाचे काम असेल, तर कोणत्याही अधिकाऱ्याला आपल्याकडे फाईल घेऊन या म्हणण्यापेक्षा ते स्वत:च जात असल्याने इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांची मात्र भंबेरी उडत आहे. ते कधी कुठल्या ठिकाणी अचानक येतील, हे सांगता येत नसल्याने ते कार्यालयाच्या बाहेर पोर्चमध्ये जरी फिरत असले, तरी नेमके कोठे जातील याविषयी अंदाज घेताना कर्मचारी दिसत आहेत.