कोल्हापूर विभागामध्ये यंदा उसाचे गाळप ५३ लाख टनाने घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:51 PM2019-09-24T23:51:03+5:302019-09-24T23:51:42+5:30
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत महापुरामुळे नदी व ओढ्याकाठावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्या पुरात आठ-दहा दिवस, तर दुसऱ्यांदा आलेल्या पुरात पाच-सहा दिवस ऊस पाण्याखाली राहिल्याने तो कुजला आहे.
राजाराम लोंढे ।
कोल्हापूर : महापुराने ऊस पिकाचे मोठे नुकसान झाल्याने यंदा कोल्हापूर विभागात कसाबसा १ कोटी ७२ लाख टन ऊसच साखर कारखान्यांकडे गाळपासाठी येईल. गतवर्षीपेक्षा तब्बल ५३ लाख टन उसाच्या उत्पादनात घट होणार असल्याने हंगाम जेमतेम तीन महिनेच चालण्याचा ठोकताळा कारखान्यांचा आहे. सर्वाधिक फटका कोल्हापूर जिल्ह्यात बसणार आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत महापुरामुळे नदी व ओढ्याकाठावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्या पुरात आठ-दहा दिवस, तर दुसऱ्यांदा आलेल्या पुरात पाच-सहा दिवस ऊस पाण्याखाली राहिल्याने तो कुजला आहे. शिरोळ तालुक्यात सर्वाधिक काळ पुराचे पाणी राहिल्याने तिथे मोठे नुकसान झाले आहे. तीच परिस्थिती सांगली जिल्ह्यातही पुराच्या पाण्याने झाली. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात ६१ हजार ९९९ हेक्टरवरील ऊस पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले.
प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने घेतलेल्या आढाव्यात आगामी हंगामातील उसाच्या उत्पादनाचा अंदाज आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १०५ लाख, तर सांगली जिल्ह्यात ६७ लाख टन उसाचे गाळप होईल.गेल्या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात १३५ लाख टन, तर सांगलीत ९० लाख टन उसाचे गाळप झाले होते. या तुलनेत यंदा कोल्हापुरात ३० लाख, तर सांगलीत २३ लाख टनाने उसाच्या उत्पादनात घट होईल, असा अंदाज साखर विभागाचा आहे.
१५ नोव्हेंबरनंतरच हंगामाला प्रारंभ!
उसाची कमतरता आणि साखर उतारा पाहता, १ डिसेंबरपासून हंगाम सुरू करण्याच्या हालचाली सरकारच्या पातळीवर आहेत; पण पुणे विभागात उसाचे उत्पादन चांगले होईल, असा अंदाज असल्याने १ नोव्हेंबरपासूनच हंगामाला परवानगी द्यावी, अशी तेथील कारखानदारांची मागणी आहे, तर कोल्हापूर विभागात तीन महिनेच हंगाम चालेल एवढाच ऊस आहे. फेबु्रवारी फार तर मार्चच्या दुसºया आठवड्यात हंगाम संपणार असल्याने उताºयासाठी हंगाम उशिरा सुरू करण्याची मागणी पुढे येत आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरनंतरच धुराडी पेटणार हे निश्चित आहे.
उघडीप नसल्याने वाढ खुंटली
साधारणत: आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात उसाची वाढ जोमात होते. २००५ मध्येही महापुरात ऊसपिकाचे मोठे नुकसान झाले होते; पण पूर ओसरल्यानंतर ऊन पडल्याने पुरात सापडलेल्या उसासह उर्वरित उसाची वाढ होण्यास मदत झाली होती. पण यावेळेला आॅगस्टसह सप्टेंबरच्या निम्म्यापर्यंत वाढीस पोषक वातावरणच न राहिल्याने उसाची वाढ खुंटल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
महापुरामुळे उसाचे नुकसान झाले आहेच, त्याचबरोबर अपेक्षित वाढ नसल्याने उत्पादन घटणार आहे. आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये उसाची जोमाने वाढ होते, पण या काळातच पावसाने झोडपून काढल्याने वाढ खुंटली आहे.
- विजय औताडे,
साखर उद्योगातील तज्ज्ञ