CoronaVirus Lockdown : दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द; संभ्रमावस्था संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 04:44 PM2020-04-13T16:44:46+5:302020-04-13T16:47:53+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय रविवारी घेतला. त्याचा कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. या निर्णयामुळे संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची या पेपरबाबतची संभ्रमावस्था संपली आहे.
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय रविवारी घेतला. त्याचा कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. या निर्णयामुळे संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची या पेपरबाबतची संभ्रमावस्था संपली आहे.
दहावीचे पेपर होतील तसे ते तपासणीसाठी शिक्षकांकडे शाळांच्या माध्यमातून पाठविण्यात आले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील ‘लॉकडाऊन’मुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम ठप्प झाले आहे. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम बहुतांश प्रमाणात पूर्ण झाले आहे.
या उत्तरपत्रिका संकलनाची प्रक्रिया विभागीय मंडळाने दि. १८ मार्चपासून सुरू केली. त्यानंतर दोन दिवस ही प्रक्रिया सुरू राहिली. त्यानंतर लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया देखील थांबली. लॉकडाऊन संपल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल तयार करण्याबाबतची कार्यवाही सुरू केली जाईल. राज्य शासनाच्या आदेशानुसार या विषयाच्या मूल्यांकनाबाबतची कार्यवाही केली जाईल, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी सांगितले.
दरम्यान, भाषा, गणित आणि विज्ञान विषयाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने केली आहे. त्याबाबतचे निवेदन संघाने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिले.
कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन पेपर रद्दचा सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. या पेपरचे मूल्यांकन करताना स्कॉलर, अभ्यासू विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची सरकारने दक्षता घ्यावी.
- क्रांतिकुमार वरक, विद्यार्थी
आम्हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने चांगला निर्णय घेतला आहे. गेल्या १५ हून अधिक दिवसांपासून पेपरबाबत आमच्या मनात असलेली संभ्रमावस्था दूर झाली आहे.
-श्वेता पिसे, विद्यार्थिनी