कोल्हापूर : पाटगाव धरणग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 02:19 PM2018-12-12T14:19:09+5:302018-12-12T14:21:25+5:30
पाटगाव धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजून भिजत पडला असून तो तत्काळ मार्गी लावावा, या मागणीचे निवेदन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मंगळवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना देण्यात आले.
कोल्हापूर : पाटगाव धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजून भिजत पडला असून तो तत्काळ मार्गी लावावा, या मागणीचे निवेदन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना देण्यात आले.
महाराष्ट्र सुजलाम्-सुफलाम् होण्यासाठी शासनाने मोठमोठे प्रकल्प बांधले. या धरणाच्या पाण्यावर अनेकांचे जीवनमान उंचावले; पण ज्यांनी या धरणासाठी जमिनी दिल्या, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
घरेदारे, जमिनींचा त्याग करून दुसऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लावणाऱ्यांची अवस्था फार बिकट झाली असून, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तत्काळ निकालात काढा, अशी मागणी ‘शेकाप’चे बाबूराव कदम यांनी केली.
यावेळी मधुकर हरेल, सुशांत बोरगे, प्रकाश कदम, सुरेश वास्कर, अनंत वास्कर, संतोष परब, भीमराव वास्कर, दिगंबर वास्कर, विठ्ठल कांबळे, आदी उपस्थित होते.
या केल्या मागण्या :
- शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्थांच्या नोकºयांमध्ये पाच टक्के आरक्षण द्यावे.
- धरणाची उंची वाढल्यामुळे घरे, गोठ्यांचे नुकसान झाले. त्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे तातडीने द्यावेत.
- देय जमिनी देऊन त्यांचे पुनर्वसन करावे.
- प्रकल्पग्रस्तांना पक्के दाखले तत्काळ मिळाले पाहिजेत.
- घरांसाठी प्लॉट द्यावेत. सरकारने ठरल्याप्रमाणे घरबांधणीसाठी दीड लाख रुपये द्यावेत.
- धरणग्रस्तांच्या मुलांना शिक्षणामध्ये समांतर आरक्षण मिळालेच पाहिजे.
ज्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळणार नाही, त्यांना शासनाच्या धोरणाप्रमाणे पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे.