कोल्हापूर : ‘त्या’ वीस कैद्यांची सुटका शुक्रवारी ... राज्यातून ९८ कैद्यांची सुटका होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 11:47 AM2018-10-02T11:47:24+5:302018-10-02T11:48:16+5:30
कळंबा मध्यवर्ती कारागृहातील वीस कैद्यांची आज, मंगळवारी गांधी जयंतीनिमित्त सुटका होणार होती; परंतु केंद्र शासनाच्या आदेशानुसार तीन दिवस विविध कार्यक्रम घेऊन शुक्रवारी त्यांची सुटका
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील वीस कैद्यांची आज, मंगळवारी गांधी जयंतीनिमित्त सुटका होणार होती; परंतु केंद्र शासनाच्या आदेशानुसार तीन दिवस विविध कार्यक्रम घेऊन शुक्रवारी (दि. ५ आॅक्टोबर) त्यांची सुटका करण्यात येणार असल्याचे कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी सांगितले.
कारागृहात आल्यापासून चांगली वर्तणूक, शांत स्वभाव, नीटनेटकेपणा, कष्ट करण्याची तयारी, इतरांशी आपुलकीने बोलणे अशा सर्वसंपन्न गुण प्राप्त केलेल्या कैद्यांना दोन ते अडीच वर्षांच्या शिक्षेत सूट मिळाली आहे. त्यापैकी महाराष्टतील ५२ कारागृहांतून सुमारे ९८ कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे.
देशात २ आॅक्टोबरला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने गांधी वर्ष साजरे करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार नियमात बसलेल्या पुरुष ६० व महिला ५५ वर्षांच्या पुढील कैद्यांची शिक्षा माफ करून त्यांना घरी सोडण्याचा निरोपाचा कार्यक्रम एकाचवेळी देशातील तीन हजार कारागृहांत आज, मंगळवारी आयोजित केला होता; परंतु तीन दिवस विविध कार्यक्रम घेऊन गांधी पुतळ्याचे पूजन व हार कैद्यांच्या हस्ते घालावा. त्यांना गांधीजींच्या जीवनावरील पुस्तक भेट द्यावे, असे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. त्यामुळे देशभरातील सर्वच कैद्यांची सुटका पाच आॅक्टोबरला होणार आहे.