कोल्हापूर : माजी राजारामिन्स वृक्षरोपणाद्वारे जपणार आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:42 AM2018-05-29T10:42:11+5:302018-05-29T10:46:08+5:30
महाविद्यालयात घालविलेल्या आठवणी वृक्षाच्या माध्यमातून आयुष्यभर जपण्यासाठी राजाराम महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.
प्रदीप शिंदे
कोल्हापूर : महाविद्यालयातील दिवस आठवताच प्रत्येकाच्या मनात कोलाहल सुरू होतो, तो महाविद्यालयात घालविलेल्या आठवणींचा. मित्रमैत्रिणींसोबत केलेली दंगा-मस्ती, सर्वांनी मिळून साजरे केलेले डे, वर्गातील बाकांवर कोरलेली नावे... हे क्षण पुन्हा कधीही अनुभवता येणार नाहीत, याची जाणीव प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना नेहमीच असते. मात्र याच आठवणी वृक्षाच्या माध्यमातून आयुष्यभर जपण्यासाठी राजाराम महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.
माजी राजारामियन्स ग्रुपचे सदस्य.
राजाराम महाविद्यालयाला १३८ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. या महाविद्यालयातून अनेक दिग्गज घडले. महाविद्यालयात असताना अनेक गटातटांची टोकाची ईर्ष्या असायची. मात्र कॉलेज संपल्यानंतर अभिमानाने सर्वजण राजारामियन्स असे सांगताच, महाविद्यालयाप्रती असलेली आत्मीयता आणि कॉलेजच्या आठवणी अखंडपणे जपण्यासाठी या राजारामियन्सनी पुढाकार घेतला आहे.
कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालय परिसरात उपक्रमात सहभागी माजी राजारामियन्स ग्रुपचे सदस्य.
माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन माजी राजारामियन्स ग्रुपची स्थापना केली आहे. दरवर्षी हे विद्यार्थी एकत्र येऊन स्नेहमेळावा घेतात. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देतात. मात्र याच आठवणी जपण्यासाठी, त्यांना सामाजिक बांधीलकीची झालर देत वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम या सर्वांनी हाती घेतला आहे. महाविद्यालयाच्या परिसरात पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत. यासाठी प्राचार्य, प्राध्यापक यांच्यासह माजी विद्यार्थ्यांची समिती बनविली आहे. त्यानुसार कामाचे नियोजन केले जात आहे.
प्रत्येक झाडाला नाव
महाविद्यालयाच्या परिसरात माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. केवळ झाडे लावून काम संपणार नाही; तर ती झाडे त्या माजी विद्यार्थ्यांना दत्तक देऊन त्यांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येणार आहे. प्रत्येक झाडाची नोंदही केली जाणार आहे.
कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालय परिसरात पाच हजार झाडे लावण्याचा उपक्रमात सहभागी माजी राजारामियन्स ग्रुपचे सदस्य.
माजी विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार दत्तक झाडाला नावही दिले जाणार आहे. वर्षभरात त्या झाडाची निगा कशी राखण्यात येते, हे पाहण्यासाठी त्याच परिसरातील एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीच्या माध्यमातून जोपासलेल्या झाडांची पाहणी करून चांगले झाड संगोपन करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कारही करण्यात येणार आहे.
मंगळवारी श्रमदान
दुष्काळाची छाया दिवसेंदिवस गडद होत चालली आहे. भीषण परिस्थितीपुढे सर्वजण हतबल झाले आहेत. भविष्यातील दुष्काळी संकटाचा मुकाबला करण्यासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मंगळवारी सकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत महाविद्यालयाच्या परिसरात श्रमदान करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी विद्यार्थ्यांच्या वतीने केले आहे.
आपल्या आठवणी जपा
महाविद्यालयातील ते दिवस आयुष्यात पुन्हा कधी येणार नाहीत. मात्र त्या आठवणी वृक्षाच्या स्वरूपात जपण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत. ही झाडे पर्यावरणपूरक असणार आहेत. सध्या २००० खड्डे या ठिकाणी मारलेले आहेत. हा सर्व खर्च माजी विद्यार्थी स्वत: करीत आहेत.
शशिकांत पाटील,
माजी जीएस, राजाराम महाविद्यालय