कोल्हापूर : किरणोत्सवातील अडथळे हटविले, निषेधानंतर महापालिकेचे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:26 PM2018-11-07T12:26:18+5:302018-11-07T12:30:51+5:30
श्री अंबाबाईच्या किरणोत्सवातील अडथळ्यांवर आयोजित बैठक फिस्कटल्यानंतर महापालिकेने मंगळवारी तातडीने याबाबत पाऊल उचलत किरणोत्सव मार्गातील सात इमारतींचा अडथळा दूर केला. सोमवारी (दि. ५) देवस्थानसह पदाधिकाऱ्यांनी केलेला निषेध गांभीर्याने घेत सुट्टीच्या दिवशी ही कारवाई करण्यात आली.
कोल्हापूर : श्री अंबाबाईच्या किरणोत्सवातील अडथळ्यांवर आयोजित बैठक फिस्कटल्यानंतर महापालिकेने मंगळवारी तातडीने याबाबत पाऊल उचलत किरणोत्सव मार्गातील सात इमारतींचा अडथळा दूर केला. सोमवारी (दि. ५) देवस्थानसह पदाधिकाऱ्यांनी केलेला निषेध गांभीर्याने घेत सुट्टीच्या दिवशी ही कारवाई करण्यात आली.
श्री अंबाबाईचा किरणोत्सव उद्या, गुरुवारपासून सुरू होत आहे. किरणोत्सवातील अडथळ्यांवर चर्चा व तोडगा काढण्यासाठी सोमवारी सायंकाळी आयुक्तांच्या दालनात आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमवेत देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच मिळकतदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
मात्र दिलेल्या वेळेनंतर अर्धा तास झाला तरी आयुक्तांनी बैठक न घेतल्याने समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्यासह पदाधिकारी संतप्त झाले व आयुक्तांचा निषेध करून महापालिकेतून निघून गेले. तसेच आयुक्तांना किरणोत्सवाचे गांभीर्य नाही, त्यांना हा प्रश्नच सोडवायचा नाही, असा त्यांनी आरोप केला.
या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत आयुक्तांच्या सूचनेनुसार मंगळवारी महापालिकेचे शहर अभियंता कार्यालय व अतिक्रमण विभागाने किरणोत्सव मार्गातील अडथळे हटविण्यास सुरुवात केली. दिवसभरात आगळगावकर, देशिंगे अशा जवळपास सात मिळकतदारांच्या इमारतींचे अडथळे बऱ्याच प्रमाणात काढण्यात आले. त्यामुळे यंदाचा किरणोत्सव पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मात्र सध्या थंडी नसली तरी सूर्यास्त लवकर होत आहे.
ढगाळ वातावरण व धुक्याचाही किरणोत्सवावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, देवस्थान समितीचे अभियंता सुदेश देशपांडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.