कोल्हापूर : बलात्काऱ्यांना पक्षातून काढून टाका, ‘हिंदी है हम, हिंदोस्ता हमारा’ची पंतप्रधानांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:22 AM2018-04-26T11:22:40+5:302018-04-26T11:22:40+5:30
उन्नाव प्रकरणामध्ये भाजपच्या आमदारावर बलात्काराचा आरोप आहे, कथुवा प्रकरणामध्ये भाजपचे मंत्री तिरंगा घेऊन मोर्चामध्ये सहभागी आहेत. त्यांना तातडीने पक्षातून काढून टाकण्याची मागणी येथील ‘हिंदी है हम, हिंदोस्ता हमारा’ संघटनेच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे.
कोल्हापूर : उन्नाव प्रकरणामध्ये भाजपच्या आमदारावर बलात्काराचा आरोप आहे, कथुवा प्रकरणामध्ये भाजपचे मंत्री तिरंगा घेऊन मोर्चामध्ये सहभागी आहेत. त्यांना तातडीने पक्षातून काढून टाकण्याची मागणी येथील ‘हिंदी है हम, हिंदोस्ता हमारा’ संघटनेच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे.
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून हे मागणीचे निवेदन देण्यात आले. मोर्चेकऱ्यांच्या हातातील विविध फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. दसरा चौकातून रणरणत्या उन्हात महिला आणि कार्यकर्त्यांचा समावेश असलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
उन्नाव आणि कथुवा या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांचा सहभाग आहे. या भ्रष्ट पोलिसांमुळे अत्याचार करणाऱ्यांना बळ मिळते. आरोपी सहीसलामत सुटतात. त्यामुळे तपासात दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, सहा महिन्यांत न्याय देण्यासाठी जलद कृती न्यायालयाची स्थापना करावी, गुन्हेगारांना शिक्षाच व्हावी यासाठी प्रक्रियेमध्ये सुधारणा करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
‘खून का बदला खून’ हा प्रकार लोकशाहीमध्ये योग्य नाही, तेव्हा खून आणि बलात्काराला फाशीच्या शिक्षेचा फेरविचार व्हावा, मुलींना शालेयस्तरावर मोफत आत्मसंरक्षणाचे शिक्षण द्यावे, लैंगिक प्रबोधन करावे, अशाही मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
नायब तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांना निवेदन देण्यात आले. संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष हुमायुन मुरसल यांच्या नेतृत्वाखाली यास्मिन देसाई, शहनाज नदाफ, तनवीर बागवान, मुनेर शिकलगार, फरजाना शेख, समीर बागवान, इम्तियाज नदाफ, मुसा शेख, शौकत मुजावर, मुन्ना पठाण, मेहबूब बोजगर, बशीर पठाण, राजू शेख, सिकंदर शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते.