कोल्हापूर : ‘उदं गं आई उदं’च्या गजरात रेणुकादेवीची अंबील यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 06:22 PM2018-12-29T18:22:19+5:302018-12-29T18:56:56+5:30
भल्या पहाटे रेणुकादेवीला अभिषेक, आरती, पालखी, भाजी-भाकरी, अंबिलीचा नैवेद्य अशा धार्मिक विधींनी आणि ‘उदं गं आई उदं’च्या गजरात शनिवारी ओढ्यावरील रेणुकादेवीची अंबील यात्रा झाली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली.
कोल्हापूर : भल्या पहाटे रेणुकादेवीला अभिषेक, आरती, पालखी, भाजी-भाकरी, अंबिलीचा नैवेद्य अशा धार्मिक विधींनी आणि ‘उदं गं आई उदं’च्या गजरात शनिवारी ओढ्यावरील रेणुकादेवीची अंबील यात्रा झाली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली.
मार्गशीर्ष महिन्यात सौंदत्ती येथील पौर्णिमा यात्रेनंतर भाविकांना वेध लागतात ते ओढ्यावरील रेणुकादेवीच्या अंबील यात्रेचे. मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी विधवा होते. त्या दिवसापासून देवी व तिचे जोगती कुंकू व सौभाग्यालंकारांचा त्याग करतात. अंबील यात्रा म्हणजे देवीला सांत्वनाचा घास भरवायचा. या दिवसापासून पुन्हा कुंकू व सौभाग्यालंकार घातले जातात.
यानिमित्त शुक्रवारी (दि. २८) सायंकाळीच ओढ्यावरील मंदिरातील सोनाबाई जाधव, रविवार पेठेतील बायाक्काबाई चव्हाण व गंगावेश येथील लक्ष्मीबाई जाधव या मानाच्या तीन जगांचे मंदिर परिसरात आगमन झाले. शनिवारी पहाटे तीन वाजता देवीचा व मानाच्या जगांचा अभिषेक झाला. अलंकारिक पूजा व आरती झाल्यानंतर पहाटे चार वाजल्यापासून नैवेद्य स्वीकारण्यास सुरुवात झाली.
मेथी, वरणे-वांग्याची भाजी, बेसनाची वडी, अंबिल, भाकरी, लिंबू, केळी, कांद्याची पात असा भरला नैवेद्य देवीला दाखविण्यात आला. दुपारी पुन्हा देवीची आरती व पालखी प्रदक्षिणा झाली. देवीला नैवेद्य दाखविण्यासाठी पहाटेपासून भाविकांची मंदिर परिसरात अलोट गर्दी होती.
नैवेद्य दाखवून झाला की भाविक मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या रिकाम्या जागेत झाडाच्या सावलीत कुटुंबीयांसोबत बसून जेवणाचा लाभ घेत होते; तर लहान मुलांसह मोठी मंडळीही समोरील मैदानात मांडण्यात आलेल्या पाळणे, खेळण्याच्या साहित्यामध्ये बसून यात्रेचा आनंद घेत होती.
मंदिराच्या दुतर्फा गृहसजावट, खेळणी, इमिटेशन ज्वेलरीचे स्टॉल्स मांडण्यात आले होते. येथे खरेदीचा मनसोक्त आनंद लुटत व खाद्यपदार्थांवर ताव मारत भाविकांनी यात्रेचा दिवस घालविला. रात्री देवीची आरती झाल्यानंतर मानाचे जग व सासनकाठी आपापल्या ठिकाणी मार्गस्थ झाले.
एलईडी स्क्रीन, अंबील, सरबताची सोय
मंदिराबाहेरील भाविकांनाही देवीचे दर्शन घडावे यासाठी बाह्य परिसरात एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते. करवीरनिवासिनी रेणुका भक्त संघटनेच्या वतीने तसेच दीपक लोखंडे यांच्या वतीने अंबील, कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या वतीने भाविकांना सरबताचे वाटप करण्यात आले.