कोल्हापूरच्या संशोधकाने शोधल्या पाच नव्या पाली
By संदीप आडनाईक | Published: December 9, 2022 07:04 PM2022-12-09T19:04:19+5:302022-12-09T19:04:52+5:30
ठाकरे वाइल्ड लाइफ फाउंडेशनच्या तेजस ठाकरे आणि ईशान अगरवाल यांच्या सहकार्याने त्यांनी या दुर्मीळ पालींचा शोध लावला
संदीप आडनाईक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागातील संशोधक अक्षय खांडेकर यांनी तामिळनाडूमधील शेव्हरॉय या पर्वतरांगेतून पाच नव्या आश्चर्यकारक नवीन पालींच्या प्रजातींचा शोध लावला आहे. ठाकरे वाइल्ड लाइफ फाउंडेशनच्या तेजस ठाकरे आणि ईशान अगरवाल यांच्या सहकार्याने त्यांनी या दुर्मीळ पालींचा शोध लावला असून, त्यातील एका प्रजातीचे नाव सलीम अली यांच्या सन्मानार्थ ठेवले आहे तर इतर प्रजातींचे त्यांच्या प्रकारानुसार आणि प्रजातींच्या वैशिष्ट्यांसाठी नामकरण केले आहे.
या तिघांनी यापूर्वीही याच राज्यातून तीन नव्या पालींचा शोध लावला होता. जर्मनीमधून प्रकाशित होणाऱ्या ‘व्हर्टिब्रेट्स झूलॉजी’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत त्यांचा यासंबंधीतील शोधनिबंध बुधवारी प्रकाशित झाला.
- ''निमाॅस्पीस सलिमअली'' या प्रजातीचे नामकरण डॉ. सलीम अली यांच्या भारतातील पक्षी संशोधनामध्ये केलेल्या अतुलनीय कार्यासाठी केले आहे. ही प्रजाती कोल्ली पर्वताच्या ११०० मी.च्या वरती आढळते.
- ''निमाॅस्पीस रुधिरा'' येरकाड पर्वतावरती आढळते. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण रंगावरून तिचे नामकरण रुधिरा (रक्त) असे केले आहे.
- ''निमाॅस्पीस आगाईगंगा'' ही प्रजाती कोल्ली पर्वताच्या पूर्वेकडील उताराच्या मध्यउंचीवर आढळून येते. आगाईगंगा धबधब्याजवळ प्रथम आढळली म्हणून तिचे हे नामकरण केले आहे.
- ''निमाॅस्पीस फंटास्टिका'' ही प्रजाती कोल्ली पर्वताच्या पश्चिम उताराच्या मध्यउंचीवर आढळून येते. वैशिष्ट्यपूर्ण रंगयोजनेवरून तिचे नामकरण फंटास्टिका या ग्रीक शब्दाने केले आहे, जे नेत्रदीपक रंगाचे संकेत देते.
- ''निमाॅस्पीस पचमलाएनसीस'' या प्रजातीचे नामकरण पचमलाई या पर्वतावरून केले आहे. या प्रजाती ३० ते ३५ मिलीमीटर लांबीच्या आहेत. नराचे रंग भडक असतात तर माद्या या रंगाने फिकट असतात. या पाली मुख्यत्वे दगडांवरती आढळतात आणि दिवसा सक्रिय असतात. छोटे किडे आणि मुंग्या हे त्यांचे मुख्य खाद्य आहे.
जगभरात पालींच्या १५० हून अधिक प्रजाती आढळून येतात. आत्तापर्यंत निमाॅस्पीस प्रजातीच्या ७० हून अधिक प्रजातींची नोंद होती, त्यात या पाच प्रजातींची भर पडली आहे. निमास्पिस हा भारतातील पृष्ठवंशीय प्राण्यांमधे सर्वाधीक प्रजाती असणारा जीनस आहे. -अक्षय खांडेकर, संशोधक.