कोल्हापूर : संशोधकांनी निरीक्षणशक्ती विकसित करण्यावर भर द्यावा : जितेंद्र कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 05:03 PM2019-01-10T17:03:05+5:302019-01-10T17:04:24+5:30
संशोधन क्षेत्रात निरीक्षणाचे महत्त्व अबाधित आहे. त्यामुळे संशोधकांनी आपली निरीक्षणशक्ती विकसित करण्यावर भर देण्याची गरज आहे. मटेरियल सायन्सच्या संशोधनात विविध नवकल्पनांची निर्मिती आणि त्याच्या प्रतिपूर्तीसाठी पूरक साधनसुविधांची उपलब्धता होणे आवश्यक आहे. संशोधकांनी त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन ‘आयआयटी-बीएचयु’चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. जितेंद्र कुमार यांनी गुरूवारी येथे केले.
कोल्हापूर : संशोधन क्षेत्रात निरीक्षणाचे महत्त्व अबाधित आहे. त्यामुळे संशोधकांनी आपली निरीक्षणशक्ती विकसित करण्यावर भर देण्याची गरज आहे. मटेरियल सायन्सच्या संशोधनात विविध नवकल्पनांची निर्मिती आणि त्याच्या प्रतिपूर्तीसाठी पूरक साधनसुविधांची उपलब्धता होणे आवश्यक आहे. संशोधकांनी त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन ‘आयआयटी-बीएचयु’चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. जितेंद्र कुमार यांनी गुरूवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित ‘फिजिक्स आॅफ मटेरियल्स अन्ड मटेरियल बेस्ड डिव्हाईस फॅब्रिकेशन’या विषयावरील चौथ्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. भौतिकशास्त्र विभागाच्या सभागृहातील अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, तर सदर्न तैवान विद्यापीठाचे प्रा. डब्ल्यू. सी. चँग प्रमुख उपस्थित होते.
प्रा. जितेंद्र कुमार म्हणाले, मटेरियल सायन्सच्या क्षेत्रात मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची अत्यंत चिकित्सकपणे पडताळणी, फेरपडताळणी या बाबींना अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उपलब्धता करणे, हे सुद्धा विद्यापीठीय संशोधनासमोरील एक मोठे आव्हान आहे.
यावेळी परिषदेच्या स्मरणिकेचे सीडीच्या स्वरुपात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. पी.एस. पाटील, माजी अधिविभाग प्रमुख प्रा. सी.डी. लोखंडे, प्रा. सी.एच. भोसले, आदी उपस्थित होते. अधिविभाग प्रमुख प्रा. व्ही. जे. फुलारी यांनी प्रास्ताविक केले. परिषदेचे समन्वयक प्रा. ए. व्ही. मोहोळकर यांनी परिषदेच्या उद्दिष्टांविषयी माहिती दिली. नीलेश तलवार यांनी आभार मानले.
समाजाला माहिती द्यावी
या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, नवसंकल्पना, नवनिर्मितीला संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्व आले आहे. त्यामुळे संशोधन, विकास या क्षेत्राला सुगीचे दिवस आले आहेत. या नवनिर्मितीच्या केंद्रस्थानी मटेरियल सायन्स आहे. संशोधकांनी वैज्ञानिक क्षेत्राच्या परीघाबाहेरील व्यापक समाजापर्यंत या संशोधनाची माहिती देण्यासाठी तर नवसंशोधकांनी स्टार्ट-अपच्या माध्यमातून आपल्या नवसंकल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.