... कोल्हापूरवासिय दचकलेच... कारण थेट आयुक्तच बोलले की; हॅलो... मी आयुक्त बोलतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:25 AM2020-04-17T11:25:03+5:302020-04-17T11:28:49+5:30
ते म्हणाले, आपल्या घरी सर्वेक्षणासाठी महापालिकेकडून कोणी आले होते का, कितीजण आले होते, आपल्याला त्यांनी कोणकोणते प्रश्न विचारले; तसेच आपण घरीच रहा, सुरक्षित रहा, विनाकारण बाहेर फिरू नका, असे प्रबोधनही त्यांनी केले.
कोल्हापूर : ‘हॅलो... मी आयुक्त बोलतोय.... आपल्या घरी सर्वेक्षणासाठी महापालिकेकडून कोणी आले होते का, कितीजण आले होते, तुम्हाला त्यांनी कोणकोणते प्रश्न विचारले,’ असा फोन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नागरिकांना केला. थेट आयुक्तांचा फोन आल्यामुळे नागरिकांनाही धक्का बसला, तर काहींची तारांबळ उडाली.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. यामध्ये महापालिकेचा आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स हे काम करीत आहेत. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी अचानक राजारामपुरी कुटुंब कल्याण केंद्र येथे भेट दिली. त्यांनी सर्वेक्षणाच्या कामाचा आढावा घेतला. हे काम योग्य पद्धतीने होते की नाही, यासाठी त्यांनी काही भागांमधील १० नागरिकांना थेट फोन करूनच सर्व्हे झाला की नाही याबाबतची उलटतपासणी केली. ते म्हणाले, आपल्या घरी सर्वेक्षणासाठी महापालिकेकडून कोणी आले होते का, कितीजण आले होते, आपल्याला त्यांनी कोणकोणते प्रश्न विचारले; तसेच आपण घरीच रहा, सुरक्षित रहा, विनाकारण बाहेर फिरू नका, असे प्रबोधनही त्यांनी केले.
महापालिकेच्या सर्वेक्षणाचे काम व्यवस्थित सुरू आहे की नाही याची पडताळणी केली. तसेच लॉकडाऊनचे उल्लंघन करून काही नागरिक शहरामध्ये येत आहेत. त्यामुळे त्यांची ‘सीपीआर’मध्ये तत्काळ तपासणी करून घ्यावी. त्याचबरोबर जे नागरिक होम क्वारंटाईन आहेत, तेथे भेट देऊन अथवा त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांची चौकशी करावी. घरोघरी सर्व्हेक्षण करीत असताना ताप, सर्दी, खोकला अशा प्रकारचे रुग्ण आढळून आल्यास त्यांना तातडीने सीपीआरला पाठवून त्यांची तपासणी करून घ्यावी, अशा सूचना प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या.
- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, कोल्हापूर