कोल्हापूरकरांनी वर्षभरात रिचवली २ कोटी लिटर दारू, ६४३ कोटींवर महसूल जमा

By उद्धव गोडसे | Updated: April 10, 2025 17:37 IST2025-04-10T17:36:21+5:302025-04-10T17:37:14+5:30

उद्धव गोडसे कोल्हापूर : दारूची किंमत कितीही वाढली तरी तिच्या विक्रीचे आकडे काही कमी होत नाहीत. गेल्या वर्षभरात कोल्हापूरकरांनी ...

Kolhapur residents consumed 2 crore liters of liquor in a year collecting revenue of Rs 643 crore | कोल्हापूरकरांनी वर्षभरात रिचवली २ कोटी लिटर दारू, ६४३ कोटींवर महसूल जमा

कोल्हापूरकरांनी वर्षभरात रिचवली २ कोटी लिटर दारू, ६४३ कोटींवर महसूल जमा

उद्धव गोडसे

कोल्हापूर : दारूची किंमत कितीही वाढली तरी तिच्या विक्रीचे आकडे काही कमी होत नाहीत. गेल्या वर्षभरात कोल्हापूरकरांनी तब्बल २ कोटी ८४ लाख लिटर दारू रिचवली. विशेष म्हणजे यात एक कोटी ६ लाख ६१ हजार लिटर देशी दारूचा समावेश आहे. यावरून देशीला मिळणारी पसंती स्पष्ट होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये दारूची विक्री पाच टक्क्यांनी वाढली, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात सुमारे पाच कोटींची वाढ झाली आहे.

६४३ कोटी ९४ लाखांचा महसूल जमा

देशी आणि विदेशी दारूची निर्मिती, विक्री, नवीन परवाने, जुन्या परवान्यांचे नूतनीकरण आणि दंड यातून राज्य उत्पादन शुल्क विभागाने २०२४-२५ या वर्षात ६४३ कोटी ९४ लाखांचा महसूल जमा केला. २०२३-२४ या वर्षात ६३९ कोटी ५२ लाखांचा महसूल जमा झाला होता. गतवर्षी यात सुमारे पाच कोटींची वाढ झाली.

देशीलाच सर्वाधिक पसंती

विदेशी दारूचे अनेक ब्रँड बाजारात उपलब्ध असले तरी पिणाऱ्यांकडून देशी दारूलाच सर्वाधिक पसंती दिली जात आहे. गेल्या वर्षभरात १ कोटी ६ लाख ६१ हजार २०५ लिटर देशी दारूची विक्री झाली. विदेशीने देशीला जोरदार टक्कर दिली असून, १ कोटी ३ लाख १२ हजार ३४७ लिटर विदेशी दारूची विक्री झाली. वाइनची विक्री सर्वांत कमी आहे. ३ लाख २४ हजार ५२३ लिटर वाइनची विक्री झाली.

निर्मितीमधून मिळाले ५७८ कोटी

देशी आणि विदेशी दारूच्या निर्मितीमधून राज्य उत्पादन शुल्क विभागाला घसघशीत महसूल मिळतो. जिल्ह्यात विदेशीनिर्मितीचे दोन, तर देशीनिर्मितीचा एक कारखाना आहे, तसेच स्पिरिटनिर्मितीचे १७ कारखाने आहेत. यातून गेल्या वर्षभरात ५७८ कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला. विक्री, दंड आणि परवाने नूतनीकरणातून ६५ कोटींची महसूल मिळाला.

दारू आरोग्यासाठी धोकादायक

दारूमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते. दारूच्या अतिसेवनामुळे शरीरावर गंभीर परिणाम होतात. काही अवयव निकामी होऊन मृत्यू ओढवण्याचा धोकाही असतो. त्यामुळे दारू पिऊ नये, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

अवैध दारूचे २,२५७ गुन्हे

अवैध दारूची निर्मिती, वाहतूक आणि विक्री केल्याचे २,२५७ गुन्हे दाखल झाले. यात २,१५२ संशयितांना अटक करण्यात आली. २ कोटी ३२ लाखांची १६९ वाहने जप्त केली. ६ कोटी २० लाख रुपयांची १४ हजार १८८ लिटर दारू जप्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दारूचा महापूर (लिटरमध्ये)

  • देशी : १ कोटी ६ लाख ६१ हजार २०५
  • विदेशी : १ कोटी ३ लाख १२ हजार ३४७
  • बीअर : ७० लाख ९७ हजार ७८० लिटर
  • वाइन : ३ लाख २४ हजार ५२३


विक्रीची दुकाने

  • वाइन शॉप - ४४
  • देशी दारू दुकाने - २४२
  • बीअर शॉपी - २१३
  • परमिट रूम - १,०००

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात २ कोटी ८४ लाख लिटर दारूची विक्री झाली. विक्री, निर्मिती, परवाने आणि दंडातून ६४३ कोटी ९४ लाखांचा महसूल जमा झाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत महसुलात सुमारे पाच कोटींची वाढ आहे. - स्नेहलता नरवणे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

Web Title: Kolhapur residents consumed 2 crore liters of liquor in a year collecting revenue of Rs 643 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.