नेमबाज ‘स्वरूप’च्या कामगिरीकडे कोल्हापूरवासीयांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:25 AM2021-08-29T04:25:21+5:302021-08-29T04:25:21+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरचा पॅरा नेमबाज स्वरूप उन्हाळकर सोमवारी (दि. ३०) टोकियो येथे सुरू असलेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत दहा मीटर ...
कोल्हापूर : कोल्हापूरचा पॅरा नेमबाज स्वरूप उन्हाळकर सोमवारी (दि. ३०) टोकियो येथे सुरू असलेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात आपले कसब दाखवणार आहे. त्याच्या कामगिरीकडे कोल्हापूरसह देशवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
स्वरूप जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दहा पदके, तर राष्ट्रीय स्पर्धांत वीस पदकांची कमाई केली आहे. घरची प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या स्वरूपची आई सविता उन्हाळकर या आर. के. नगरातील गणेश मंदिराजवळ अगरबत्ती व बांगड्या विकून उदरनिर्वाह करतात. त्यातच स्वरूपला घडविण्यात त्यांनी रात्रीचा दिवस केला आहे. जन्मापासून पायांनी पोलिओग्रस्त असलेल्या स्वरूपने पाच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पॅरा स्पर्धा गाजविल्या आहेत. महाराष्ट्र शासनानेही त्याला शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविले आहे. तो सध्या दसरा चौकातील छत्रपती शहाजी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकत आहे. त्याचा सोमवारी नेमबाजीतील १० मीटर एअर रायफल प्रकारातील इव्हेंट आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे देशवासीयांचे डोळे लागून राहिले आहेत.
आता स्वरूपच्या कामगिरीवर सर्वांच्या आशा
कोल्हापूरच्या सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत व राही सरनोबत यांचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्या फेरीतच आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे तिसरा कोल्हापूरकर म्हणून स्वरूपच्या पॅराऑलिम्पिकमधील नेमबाजीच्या इव्हेंटकडे सगळ्यांच्या आशा लागून राहिल्या आहेत.
प्रतिक्रिया
गेल्या महिनाभरापासून तो दिल्लीत नेमबाजीचा सराव करीत होता. सध्या तो जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. कामगिरीतील सातत्यामुळे निश्चितच टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकेल.
प्रा. प्रशांत पाटील, शारीरिक शिक्षण संचालक, छत्रपती शहाजी काॅलेज