कोल्हापूरकरांना आणखी दहा दिवस पाणीटंचाईची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:24 AM2021-07-29T04:24:56+5:302021-07-29T04:24:56+5:30
कोपार्डे : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारे बालिंगा, नागदेवाडी, शिंगणापूर पंपिंग स्टेशनपैकी केवळ बालिंगा पंपिंग हाऊसमधून २२ लाख ...
कोपार्डे : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारे बालिंगा, नागदेवाडी, शिंगणापूर पंपिंग स्टेशनपैकी केवळ बालिंगा पंपिंग हाऊसमधून २२ लाख लिटरने पाणीपुरवठा सुरू असून कोल्हापूरचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी दहा-बारा दिवस वाट पाहावी लागणार आहे. शिंगणापूर व नागदेवाडी पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफाॅर्मर पाण्यात अडकल्याने पाणीपुरवठा विभागाकडे सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
कोल्हापूर शहराला प्रत्यक्षात दररोज ९५ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. त्यातील बालिंगा पंपिंग स्टेशनमधून २२ लाख लिटर, नागदेवाडी १८ लाख लिटर शिंगणापूर येथील दोन पंपिंग स्टेशनमधून ५५ लाख लिटर दररोज शहरासाठी पाणीपुरवठा केला जातो. यातील बालिंगा पंपिंग स्टेशन मधील २०० व १५० एचपीचे दोनच पंप कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून सुरू झाले आहेत. यातून २२ लाख लिटरचा पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरातील ए, बी,सी या तीन वॉर्ड ना पाणीपुरवठा केला जात आहे.
नागदेवाडी पंपिंग स्टेशनमधील ट्रान्सफाॅर्मर विद्युत मोटर पॅनेल स्टार्टर पाण्याखाली गेल्याने खराब झाले आहेत. सध्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून विद्युत मोटर,पॅनेल,स्टार्टर ओव्हन मध्ये टाकून हिटिंग करून जोडण्यासाठी तयार ठेवले आहेत. पण ट्रान्सफॉर्मर अजून पाच फूट पुराच्या पाण्यात असल्याने आणि तो बाहेर काढण्यासाठी तेथे पोहचता येत नसल्याने कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. येथील पाणी कमी झाल्यानंतर ट्रान्सफॉर्मर बदलता येणार आहे यासाठी किमान तीन दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे सांगण्यात आले.
अशीच परिस्थिती शिंगणापूर जॅकवेलची आहे. शिंगणापूर येथून कसबा भावड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या ५४० व ७५० एचपीच्या दोन विद्युत पंप आहेत तर आपटेनगर व पुईखडीकडे पाणीपुरवठा करण्यासाठी ४३५ एचपीचे ४ पंप आहेत या सर्व विद्युत मोटर व वीजपुरवठा करणारे ट्रान्सफाॅर्मर पाण्याखाली गेल्यामुळे येथून पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प झाली आहे. सध्या शिंगणापूर जॅकवेलच्या ट्रान्सफाॅर्मरच्या ठिकाणी आठ ते दहा फूट पाणी असल्याने हे ट्रान्सफाॅर्मर बदलण्यासाठी अडचणी येत आहेत. यासाठी किमान आठ ते दहा दिवस लागणार आहेत. यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
चौकट : आ. चंद्रकांत जाधव यांनी बुधवारी बालिंगा नागदेवाडी शिंगणापूर पंपिंग स्टेशनला भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली अधिकाऱ्यांना तातडीने येथील तांत्रिक अडचणीत दूर करून शहराचा पाणीपुरवठा तत्काळ सुरू करण्याच्या सूचना केल्या.
कोट : नागदेवाडी व शिंगणापूर येथील ट्रान्सफाॅर्मर काढण्यासाठी बुधवारी क्रेन आणण्यासाठी पाण्याची पातळी तपासण्यात आली. पण पाण्याची पातळी जास्त असल्याने ट्रान्सफॉर्मरपर्यंत ट्रेन पोहचू शकत नाही. महापुरात ट्रान्सफाॅर्मर गेल्यामुळे यातील ऑईल फिल्टर केल्याशिवाय व विद्युत मोटर हिटिंग केल्याशिवाय पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकत नाही. जयेश जाधव, उप अभियंता.
फोटो : २८ शिंगणापूर पाणीपुरवठा
१)नागदेववाडीतील पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर पाण्यात. २)महापुराचे पाणी पॅनेल बोर्डमध्ये शिरल्याने ते खराब झाले आहेत.