'टोलमुक्ती'च्या मुद्यावर कोल्हापूरकर 'मतदान' करतील, चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 12:14 PM2022-03-29T12:14:49+5:302022-03-29T12:15:45+5:30
कोल्हापूरच्या जनतेला ३० वर्षे टोलचा त्रास सहन करावा लागणार होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना क्षणाचाही विलंब न करता टोलमुक्तीसाठी ४७३ कोटी रुपये निधी मंजूर करून कोल्हापूरकरांच्या मानगुटीवर बसणारा हा टोल रद्द करण्यात आला.
कोल्हापूर : कोल्हापूरच्या जनतेला ३० वर्षे टोलचा त्रास सहन करावा लागणार होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना क्षणाचाही विलंब न करता टोलमुक्तीसाठी ४७३ कोटी रुपये निधी मंजूर करून कोल्हापूरकरांच्या मानगुटीवर बसणारा हा टोल रद्द करण्यात आला. या एकाच टोलमुक्तीच्या मुद्यावर ‘उत्तर’मधील कोल्हापूरकर भाजपला मतदान करतील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
भाजप उमेदवार सत्यजित ऊर्फ नाना कदम यांच्या प्रचारार्थ शहर भाजपच्यावतीने सोमवारी रंकाळा तलाव परिसरात ‘चाय पे चर्चा’ उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पाटील यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, सुहास लटोरे, सुदर्शन पाटील, प्रताप देसाई, किरण नकाते उपस्थित होते. सत्यजित कदम हे कोल्हापूरच्या राजकारण आणि समाजकारणातील अतिशय जुनं घराणं आहे. त्यांचे वडील शिवाजीराव कदम यांनी महापौर म्हणूनही कोल्हापूरकरांची सेवा केली आहे. सत्यजित कदम हे देखील सामाजिक कामामुळे जनतेशी जोडले गेलेले आहेत, असे यावेळी पाटील म्हणाले.
धनंजय महाडिक म्हणाले की, ज्याप्रमाणे आपण आरोग्याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे उत्तर कोल्हापूरकर जनतेने शहराच्या काळजीसाठी भाजपाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. सन २०१९ च्या महापुरानंतर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यामुळे तातडीने नुकसान भरपाई मिळाली. पण, सन २०२१ च्या महापुरातील नुकसानाचे पैसे अजूनही कोल्हापूरकरांना मिळाले नाहीत. त्यामुळे उत्तर कोल्हापूरमधील जनता पोटनिवडणुकीत विरोधकांना त्यांची योग्य जागा दाखवून देतील.