कोल्हापूर : चिल्लर पार्टी, इला फौंडेशनच्या घुबड वाचवा मोहिमेला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 04:42 PM2018-10-20T16:42:19+5:302018-10-20T16:44:20+5:30
चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत इला फौन्डेशनच्या सहकार्याने सुरु केलेल्या घुबड वाचवा मोहिमेस जिल्ह्यातील विविध शाळांमधून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २५ शाळांमधून या मोहिमेअंतर्गत घुबडांविषयी जनजागृती करणाऱ्या स्लाईड शो दाखविण्यात आले.
कोल्हापूर : चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत इला फौन्डेशनच्या सहकार्याने सुरु केलेल्या घुबड वाचवा मोहिमेस जिल्ह्यातील विविध शाळांमधून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २५ शाळांमधून या मोहिमेअंतर्गत घुबडांविषयी जनजागृती करणाऱ्या स्लाईड शो दाखविण्यात आले.
केर्ली ता. करवीर येथील केर्ली माध्यमिक विद्यालय येथे शनिवारी घुबड वाचवा मोहिमेअंतर्गत स्लाईड शो दाखविण्यात आला. चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचे कार्यकर्ते अभियंता मिलिंद नाईक यांनी स्लाईड शोमधील घुबडांविषयी माहिती दिली.
यावेळी चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या विविध उपक्रमांचीही माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव मोहन पाटील, मुख्याध्यापक अरुण भोसले, आर. वाय. पाटील, आर्किटेक्ट सुधीर राऊत आदी उपस्थित होते. या शाळेतील ४०० विद्यार्थी-विद्यार्थीनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, करवीर तालुक्यातील विविध शाळांमधून या घुबड वाचवा मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर शहरातील वि. स. खांडेकर, तात्यासाहेब मोहिते, शिवाजी मराठी हायस्कूल, दादासाहेब मगदूम हायस्कूल, विकास विद्यामंदिर, जीवन कल्याण प्राथमिक विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, अण्णासो शिंदे, साने गुरुजी वसाहत येथील गोविंद पानसरे विद्यालय, उषाराजे हायस्कूल, न्यू माध्यमिक विद्यालय आदी शाळेत स्लाईड शो दाखविण्यात आले.
चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचे मिलिंद यादव, मोहिमेच्या समन्यवयक शिवप्रभा लाड, पद्मजा दवे, अभय बकरे, सुधाकर सावंत, मिलिंद नाईक, उदय संकपाळ, गुलाबराव देशमुख आदी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.