कोल्हापूर : यूथ बॅँकेच्या व्यवहारांवर निर्बंध, रिझर्व्ह बॅँकेची मोठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 01:24 PM2019-01-07T13:24:04+5:302019-01-07T13:27:12+5:30
कोल्हापूर येथील यूथ डेव्हलपमेंट को-आॅप. बॅँकेवर रिझर्व्ह बॅँकेने कलम ३५ (ए) नुसार व्यवहार करण्यास निर्बंध आणले आहेत. कर्ज व ठेवींचे संतुलन न राखल्याचा ठपका ठेवत बॅँकेची सर्व खाती गोठविली आहेत. ग्राहकांना सहा महिन्यांत खात्यावरील केवळ पाच हजार रुपयेच काढता येणार आहेत.
कोल्हापूर : येथील यूथ डेव्हलपमेंट को-आॅप. बॅँकेवर रिझर्व्ह बॅँकेने कलम ३५ (ए) नुसार व्यवहार करण्यास निर्बंध आणले आहेत. कर्ज व ठेवींचे संतुलन न राखल्याचा ठपका ठेवत बॅँकेची सर्व खाती गोठविली आहेत. ग्राहकांना सहा महिन्यांत खात्यावरील केवळ पाच हजार रुपयेच काढता येणार आहेत.
या बॅँकेतून ‘गोकुळ’च्या कर्मचाऱ्यांच्या पगारासह इतर कर्मचाऱ्यांचे इतर व्यवहारही होत असल्याने त्यांच्यातच एकच खळबळ उडाली आहे. या बॅँकेचे सध्या आर. बी. पाटील हे अध्यक्ष आहेत; पण बॅँकेवर माजी आमदार महादेवराव महाडिक व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांची स्थापनेपासून एकहाती सत्ता आहे. त्यामुळे या कारवाईचे जिल्ह्याच्या राजकारण व लोकसभा निवडणुकीतही पडसाद उमटणार आहेत.
कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या यूथ बॅँकेच्या १२ शाखा आहेत. आर्थिक शिस्तीच्या बळावर बॅँकेने ४३ वर्षांत चांगलीच मुसंडी मारली; पण गेल्या काही वर्षांपासून बॅँकेचा आर्थिक स्तर घसरत गेला. बॅँकेच्या ठेवी १२० कोटी, तर कर्जांचे केवळ ३८ कोटींचे वाटप झाले. त्यांपैकी १७ कोटींची थकबाकी आहे. बॅँ
किंग धोरणानुसार ठेवींच्या प्रमाणात कर्जाचे वाटप नाही. त्याशिवाय स्वभांडवलही कमी झाले आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या निकषांनुसार एक लाखाच्या आत स्वभांडवल येता कामा नये. एकूणच बॅँकेच्या व्यवस्थापनाचा व्यवहार ठेवीदारांच्या हिताचा नसल्याचे रिझर्व्ह बॅँकेचे मत झाल्याने त्यांनी थेट कारवाई केली.
यूथ बॅँकेला व्यवहार करण्यास निर्बंध घातल्याने एकच खळबळ उडाली. बॅँकेचे एटीएमसह इतर व्यवहार रिझर्व्ह बॅँकेने बंद केले आहेत. ‘यूथ’चे व्यवहार असणाऱ्या बॅँकांना या बॅँकेचे खाते गोठविण्याचे आदेश दिले आहेत. निर्बंध घातल्याने सहा महिन्यांत खात्यावरील केवळ पाच हजार रुपयेच काढता येणार असल्याने ग्राहकांचे धाबे दणाणले.
या बॅँकेतून ‘गोकुळ’च्या कर्मचाऱ्यांचे पगारही होतात. महिन्याला दोन ते अडीच कोटी रुपये पगार ‘गोकुळ’चा होतो. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या फंडाची रक्कम, काही दूध संस्थांची बिलेही याच बॅँकेतून होतात. हे सगळे व्यवहार ठप्प झाले आहेत. ‘गोकुळ’ कर्मचारी सोसायटी कर्मचाऱ्याना गृहबांधणीसाठी सात लाख रुपये एकरकमी कर्ज उपलब्ध करून देते.
कर्मचारी ही रक्कम घरी ठेवायला नको म्हणून या बॅँकेत ठेवतात. आता बॅँकेवर निर्बंध आल्याने अनेकांची चांगलीच अडचण झाली आहे. निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम अनेक कर्मचाऱ्यांनी या बॅँकेत ठेव म्हणून ठेवली आहे. त्यांचीही या कारवाईने पाचावर धारण बसली.
दिवसभर शाखांत खलबते
रिझर्व्ह बॅँकेने कारवाईचे पत्र शनिवारी दुपारी यूथ बॅँकेसह तिच्याशी संलग्न बॅँकांना पाठविले. त्यानंतर ‘यूथ’चे संचालक मंडळ हडबडले. रविवारी दिवसभर बॅँकेच्या बहुतांशी शाखा सुरू होत्या.
ग्राहकांची घालमेल
बॅँकेच्या ग्राहकांना ‘यूथ’वर रिझर्व्ह बॅँकेने केलेल्या कारवाईची रविवारी सकाळी कुणकुण लागल्यानंतर ग्राहकांनी अनेक शाखांमध्ये धाव घेतली. आपल्या खात्यावरील पैशाचे काय होणार? अशी विचारणाही ग्राहक करीत होते.
‘गोकुळ’ने कर्मचाऱ्यांना अॅडव्हान्स द्यावा
यूथ बॅँकेवर कारवाई झाल्याने सर्वाधिक अडचणी ‘गोकुळ’च्या कर्मचाऱ्यांची झाली. त्यांचा पगार या बॅँकेतून महिन्याच्या सात तारखेला होतो. आता तो होणार नसल्याने संचालकांनी आम्हाला एका पगाराचा अॅडव्हान्स द्यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. या बॅँकेचे दोन संचालक ‘गोकुळ’मध्येही सत्तेत असल्याने ही मागणी झाली आहे.
दृष्टिक्षेपात यूथ बॅँक
- स्थापना - १९७५
- कार्यक्षेत्र- कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग
- शाखा - १२
- ठेवी- १२० कोटी
- कर्जे- ३८ कोटी
- थकबाकी- १७ कोटी