कोल्हापूर : बटाट्यासह जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम, चक्का जाम आंदोलनाचा सहावा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 05:51 PM2018-07-25T17:51:27+5:302018-07-25T17:55:21+5:30
माल वाहतूकदारांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरू केलेल्या देशव्यापी चक्का जाम आंदोलनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कांदा, बटाट्यांसह जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम झाल्याने त्यांचा काही अंशी तुटवडा निर्माण झाला आहे.
कोल्हापूर : माल वाहतूकदारांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरू केलेल्या देशव्यापी चक्का जाम आंदोलनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कांदा, बटाट्यांसह जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम झाल्याने त्यांचा काही अंशी तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात तब्बल १२०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. हे आंदोलन आणखी दोन दिवस सुरू राहिल्यास गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्हा प्रशासनाने वाहतूकदारांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मागे न हटण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. कच्च्या मालाच्या अभावामुळे तसेच तयार माल पडून राहिल्याने औद्योगिक वसाहतीमधील काम मंदावले आहे.
आॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉँग्रेसने देशव्यापी चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये कोल्हापुरातील लॉरी आॅपरेटर्स असोसिएशननेही उत्स्फूर्त सहभाग घेतल्यामुळे जिल्ह्यातील १६ हजार ट्रक व १० हजार टेम्पोचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून दररोज किमान ६०० ट्रक साखर देशभरात निर्यात केली जाते; पण वाहतूकदारांनी संप पुकारल्यामुळे सहा दिवसांत साखरेचा उठाव झाला नाही. परिणामी ५००० टन साखर तीन जिल्ह्यांतील गोदामांत पडून आहे. यातून साखर उद्योगाची २०० कोटींची उलाढाल थांबली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात दररोज येणारा भाजीपाला, कांदा-बटाटे, गॅस सिलिंडर, धान्य, पेट्रोल, डिझेल यांवर विपरीत परिणाम झाला आहे. आवक थांबल्यामुळे मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. किमान १० दिवस पुरेल इतका धान्यसाठा कोल्हापुरात होता. त्यातील वितरित झाल्याने बाहेरून धान्य आल्याशिवाय गत्यंतर नाही.
रस्त्यावर एकही ट्रक येणार नाही, याची खबरदारी लॉरी असोसिएशनने घेतली आहे. जे ट्रक चोरटी वाहतूक करतील अशा वाहनांतील हवा सोडणे, जाळपोळ करणे, चालकास मारहाण करण्याचे प्रकार घडत असल्याने ट्रकचालक भीतीने वाहने रस्त्यावर आणत नाहीत.
जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी लॉरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र हा देशव्यापी संप असल्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत चक्का जाम आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय वाहनधारकांनी घेतला आहे.
याचा विपरीत परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्यावर झाला आहे. कांदे, बटाटे, डाळी व भाजीपाल्याचा तुटवडा असल्याने दरवाढही झाली आहे. सहा दिवसांत जिल्ह्यात बाराशे कोटींहून अधिक उलाढाल मंदावली आहे.
मालाचा पुरवठा नसल्याने कामगार बसून
औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांमध्ये कच्च्या मालाचा पुरवठा नसल्याने कामगार बसून आहेत. त्यामुळे कामगारांचा पगार उद्योजकांच्या अंगावर पडत आहे.