कोल्हापूर : गांधीनगरच्या व्यापाऱ्यास मारहाण करून लूटमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 04:56 PM2018-10-09T16:56:08+5:302018-10-09T17:00:37+5:30
गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी कापड व्यापाऱ्यांस आठ ते दहा जणांनी वाटेत अडवून बेदम मारहाण केली. यावेळी त्यांच्या अंगावरील तीन तोळ्यांची चेन हिसकावून घेतली.
कोल्हापूर : गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी कापड व्यापाऱ्यांस आठ ते दहा जणांनी वाटेत अडवून बेदम मारहाण केली. यावेळी त्यांच्या अंगावरील तीन तोळ्यांची चेन हिसकावून घेतली.
शामलाल आरतमल बचराणी (वय ६०, रा. स्वामी टेऊराम अपार्टमेंट, मसूबाबा रोड, गांधीनगर) असे जखमी व्यापाऱ्यांचे नाव आहे. सोमवारी (दि. ८) दुपारी रुईकर कॉलनी, परख हॉटेलच्या रिकाम्या मैदानाशेजारी ही घटना घडली.
बचराणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी संशयित विक्रम सुंदराणी (३०), कैलाश सुंदराणी (२७), सागर सुंदराणी (२४, सर्व रा. गांधीनगर) यांच्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल केला. पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत, अशी माहिती शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.
अधिक माहिती अशी, शामलाल बचराणी यांचे गांधीनगरमध्ये कापड दुकान आहे. संशयित सुंदराणी टोळी ही त्यांच्याकडून दर महिन्याला दमदाटी करून हप्ता वसूल करीत असते. त्यांचा मुलगा रोशन दुकानात असताना या टोळीने दुकानातील साडेनऊ हजार रोकड आणि सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली होती. या प्रकरणी बचराणी यांनी सुंदराणी टोळीच्या विरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात लूटमारीची फिर्याद दिली होती.
या टोळीविरोधात अशा तीन ते चार तक्रारी दाखल आहेत. शामलाल सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास मोपेडवरून तारीख असल्याने न्यायालयात आले. काम आवरून ते परत घरी जात असताना रुईकर कॉलनी येथील मैदानाशेजारी दबा धरून बसलेल्या टोळीने त्यांची मोपेड अडविली.
त्यांना ‘आमच्या विरोधात दिलेली गांधीनगर पोलीस ठाण्यातील तक्रार मागे घे; आज तुला जिवंत सोडत नाही,’ असे म्हणून बेदम मारहाण केली. यावेळी गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून घेत पळून गेले. भांबावलेल्या बचराणी यांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली.
सुंदराणी टोळी लूटमारीमध्ये पटाईत
गांधीनगर व्यापारपेठेत अनेक व्यावसायिकांना सुंदराणी टोळीने लुटले आहे. दमदाटी आणि ठार मारण्याची धमकी देत व्यापाऱ्यांकडून हप्ते वसूल करण्यामध्ये ते पटाईत आहेत. फाळकूटदादा म्हणून त्यांची या परिसरात दहशत आहे.
या टोळीवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात चेन स्नॅचिंगचाही गुन्हा दाखल आहे. सराईत गुन्हेगार असल्याने त्यांची गांधीनगर पोलीस ठाण्यात ऊठबस असते. पोलिसांचा धाक नसल्याने त्यांचे उपद्व्याप वाढत आहेत. या टोळीच्या दहशतीपुढे येथील व्यापारी हतबल झाले आहेत.