कोल्हापूर 'आरटीओ'तील तत्कालीन लिपीक लता कांबळे निलंबित, शासकीय पैशाचा केला होता गैरवापर
By भीमगोंड देसाई | Published: August 29, 2023 07:07 PM2023-08-29T19:07:47+5:302023-08-29T19:08:31+5:30
कोल्हापूर : शासकीय पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) तत्कालीन वरिष्ठ लिपीक लता कांबळे यांना परिवहन आयुक्त ...
कोल्हापूर : शासकीय पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) तत्कालीन वरिष्ठ लिपीक लता कांबळे यांना परिवहन आयुक्त विवेक भमिनवार यांनी २५ ऑगस्टला तडकाफडकी निलंबित केले. दीड वर्षापूर्वी त्यांची सांगली आरटीओत बदली झाली होती. निलंबनाच्या कालावधीत कराड आरटीओ कार्यालयात त्यांनी काम करायचे आहे.
निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे, कांबळे या कोल्हापूर आरटीओमध्ये जून ते ऑक्टोबर २०२० मध्ये वरिष्ठ लिपीक होत्या. त्यावेळी त्यांनी अधिकाराचा गैरवापर केला. ०९ वाहनासंबंधी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार नोंदणी प्रक्रिया न करता सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही बीएस आयव्ही मानांकन वाहनाची नोंदणी गैरपध्दतीने केली. ऑदर रिजन, डीटीओ, बँक डिटेल्स यांचा चुकीच्या पध्दतीने वापर करून वाहन ४.० प्रणालीवर नोंदणी क्रमांक जारी केले.
नोंदणी शुल्क, कर भरणाही केला नाही. यासाठी मोटर वाहन निरीक्षक, नोंदणी प्राधिकाऱ्याचे अधिकार वापरले. याशविाय विविध वाहनाच्या करामध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार बाबा इंदूलकर यांच्या कॉमन मॅन संघटनेने केली होती. त्याची चौकशी झाली. चौकशीत त्यांनी ९२ वाहनांच्या विविध प्रकारच्या करांच्या पैशाचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कांबळे यांना निलंबित केले.