Kolhapur: लोक जागा दाखवतील या भीतीनेच राज्यकर्ते निवडणुका टाळताहेत, शरद पवार यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 03:35 PM2023-08-26T15:35:39+5:302023-08-26T15:36:33+5:30
Kolhapur: लोक जागा दाखवतील अशी भीती वाटत असल्यानेच राज्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला तयार नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना मांडले.
- विश्वास पाटील
कोल्हापूर - लोक जागा दाखवतील अशी भीती वाटत असल्यानेच राज्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला तयार नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना मांडले. ज्यांची जागा निवडून आणण्याची क्षमता आहे, त्यांनीच ती जागा लढविण्याचा आग्रह धरावा, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असून ती महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत मांडणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पवार शुक्रवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शनिवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्रात माझ्या ठिकठिकाणी सभा झाल्या. त्यामध्ये लोकमाणस बदलत असल्याचा अनुभव येत आहे. त्यामध्ये मुख्यत: दोन गोष्टी मला दिसतात. एक तर मूळ भाजपबद्दल लोकांत नाराजी आहे आणि दुसरे त्यांना ज्या घटकांनी गेल्या काही महिन्यांत पाठिंबा दिला त्यांच्याबद्दलही विशेषत: तरुणांत आणि इतर समाजातही कमालीची नाराजी दिसत आहे. ही नाराजी पाहूनच राज्यकर्ते महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्यायला तयार नाहीत. या निवडणुकीत लोक जागा दाखवतील, अशी चिंता त्यांना वाटते. त्याचा परिणाम आगामी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांवर होईल म्हणून त्यांनी या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, आर.के. पोवार आदी उपस्थित होते.
पवार-मुश्रीफ यांनी केलं ते मान्य नाही
ईडीच्या भीतीने नव्हे, तर अजित पवार यांची पक्षात घुसमट होत होती म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो, असे मुश्रीफ म्हणतात. अशी विचारणा केल्यावर पवार म्हणाले, त्यांच्या घरी ईडीचे पथक आल्यावर कोल्हापूरकरांनी निदर्शने केल्याचे मला माहीत आहे; परंतु त्यांनी भाजपसोबत जावे यासाठी अशी काही निदर्शने झाल्याचे मला कुठं समजलं नाही. या मंडळींनी (पवार-मुश्रीफ) जे केलं ते पक्ष म्हणून आम्हाला मान्य नाही, असे पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
राज्यकर्त्यांना शेतीच्या प्रश्नांची चिंता नाही
राज्यातील राज्यकर्त्यांना शेतीच्या प्रश्नांबद्दल ज्ञान आणि आस्थाही नसल्याची टीका पवार यांनी केली. ते म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शेती क्षेत्राच्या ज्ञानाचा अनुभव मला नाही. कदाचित ते ज्ञानी असतील; परंतु ते ज्ञान प्रत्यक्ष कधी बघायला मिळालेले नाही. दुष्काळी स्थिती, कांद्याचा प्रश्न, दूध, साखर उद्योगाच्या अडचणी याबद्दल त्यांनी गांभीर्याने चर्चा केल्याचे दिसले नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांना शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल आस्था नाही, ही चिंता करण्यासारखी गोष्ट आहे, असेही पवार यांनी सांगितले.