कोल्हापूर : शाहू समाधीवर मेघडंबरी विराजमान -संरक्षक भिंतीचे काम दोन दिवसांत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 08:27 PM2018-10-17T20:27:05+5:302018-10-17T20:31:40+5:30
ज्यांनी संपूर्ण मानवजातीला सामाजिक समतेचा संदेश दिला, त्या दस्तुरखुद्द राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या इच्छेनुसार येथील नर्सरी बागेत बांधण्यात येत असलेल्या त्यांच्या समाधिस्थळावर बुधवारी ब्रॉँझपासून बनविलेली सुमारे सव्वातीन टन वजनाची मेघडंबरी बसविण्यात आली
कोल्हापूर : ज्यांनी संपूर्ण मानवजातीला सामाजिक समतेचा संदेश दिला, त्या दस्तुरखुद्द राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या इच्छेनुसार येथील नर्सरी बागेत बांधण्यात येत असलेल्या त्यांच्या समाधिस्थळावर बुधवारी ब्रॉँझपासून बनविलेली सुमारे सव्वातीन टन वजनाची मेघडंबरी बसविण्यात आली. समाधिस्थळाचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्यात संरक्षक भिंतीचे तसेच सौंदर्यीकरणाचे काम पुढील चार महिन्यांत पूर्ण करण्याचा निर्धार महापालिका प्रशासन व ठेकेदाराने केला.
राजर्षी शाहू महाराज यांची समाधी नर्सरी बागेत व्हावी, अशी इच्छा खुद्द शाहू महाराजांनीच त्यांच्या मृत्युपत्रात व्यक्त केली होती. महाराजांची ही इच्छा त्यांच्या मृत्यूपश्चात तब्बल ९६ वर्षांनी पूर्ण होण्याचा योग जुळून आला आहे. या कामासाठी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने आग्रह धरणाºया माजी महापौर हसिना फरास व माजी स्थायी सभापती आदिल फरास यांनी मेघडंबरी जागेवर बसविताच आनंद व्यक्त केला.
सुमारे सव्वातीन टन वजन तसेच पंधरा फूट उंचीच्या ब्रॉँझच्या या मेघडंबरीचे केवळ फिनिशिंगचे काम राहिले असून, ते पंधरा दिवसांत पूर्ण होईल, असे शिल्पकार किशोर पुरेकर यांनी सांगितले. समाधिस्थळाचे बांधकाम आणि मेघडंबरी याकरिता एक कोटी तीन लाख रुपये खर्च झाले आहेत. आता समाधिस्थळाभोवतीच्या संरक्षक भिंतीचे काम दोन दिवसांत सुरू केले जाणार आहे. त्यासाठी एक कोटी नऊ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, ठेकेदारास वर्क आॅर्डरही दिली आहे. प्रत्यक्ष सहा महिने कामाची मुदत असली तरी हे काम तीन ते चार महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असे ठेकेदार व्ही. के. पाटील यांनी सांगितले.